मुंबई : गेले ११ दिवस लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा करून शनिवारी संपूर्ण राज्यभरात विसर्जनानिमित्त मिरवणुका निघाल्या. पुणे आणि मुंबईत रविवारी काही लाडक्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मात्र, यादरम्यान काही अनुचित घटनाही घडल्या. या दुर्घटनांमध्ये राज्यात एकूण ११ जणांना आपला जीव गमवावा लागला.
मुंबईत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान अंधेरीत साकीनाका येथील खैरानी रोडवरील एस. जे. स्टुडिओजवळ टाटा पॉवरच्या हायटेन्शन वीजतारांचा स्पर्श झाल्याने विनू शिवकुमार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे गणेश विसर्जनावेळी दोन युवकांचा मृत्यू झाला, तर बिरदवडी येथील विहिरीत एक जण आणि शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत एक जण बुडून मृत्युमुखी पावला. नांदेडमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या तिघांपैकी दोन जण पाण्यात वाहून गेले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील आसनगाव येथील भारंगी नदीच्या गणेश घाटावर पाच जण पाण्यात बुडाले. त्यापैकी दोघांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण बेपत्ता आहे. चंद्रपूरमध्येही इराई नदीवरील भटाडी पुलावर दीक्षांत मोडक (१८) याचा बुडून मृत्यू झाला.
भाईंदर पश्चिम येथील मोदी पटेल मार्गावरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढताना झाडावरील वीजवाहक तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागून प्रतीक शहा (३७) यांचा मृत्यू झाला.
गणेश विसर्जनादरम्यान आसनगावचे ३ तरुण गेले वाहून
शहापूर : आसनगाव येथील शिवतेज गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी भारंगी नदीत दत्तू लाटे या युवकाने पोलिसांची नजर चुकवून वाहत्या पाण्यात उडी घेतली असता तो तरुण बुडू लागला. ते पाहून मंडळाच्या ५-६ युवकांनी नदीत उडी घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच जण पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्याने ३ युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यातील दोन तरुणांचे मृतदेह स्थानिक जीवरक्षक टीमला सापडले असून एक जण अद्याप बेपत्ता आहेत.
रविवारी सकाळपासून ‘एनडीआरएफ’च्या टीमने शोधमोहीम सुरु केली असून माहुली किल्ल्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भारंगी नदीला पाणी वाढल्याने शोधमोहिमेत अडथळा येत आहे. पाण्याच्या प्रवाहात दत्तू लाटे (३०), कुलदीप जाखेरे (३२), प्रतिक मुंडे (२३) हे तिघे प्रवाहात वाहून गेले. रात्री उशिरा स्थानिक ग्रामस्थ व जीवरक्षक टीमच्या शोधमोहिमेनंतर प्रतिक मुंडे याचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले.
ड्रोनच्या सहाय्याने दुसरा मृतदेह मिळाला
रविवारी सकाळपासून जीवरक्षक टीमने घेतलेल्या शोधमोहिमेत नदीला पाणी भरपूर असल्याने अडथळा येत होता. त्यामुळे टीमने ड्रोनच्या सहाय्याने नदीपात्राची पाहणी सुरू केली असता नदीच्या किनाऱ्यावर दगडाच्या कपारीत दत्तू लाटे यांचा मृतदेह आढळून आला.
नांदेडमध्ये दोघे बुडाले
नांदेड : नांदेड शहरालगत असलेल्या गाडेगाव गावातील गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले दोन तरुण नदीत बुडाले, तर अन्य एकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गाडेगाव आसना नदी येथे ही दुर्दैवी घटना घडली. दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारपर्यंत ‘एसडीआरएफ’ पथकाकडून दोघांचा शोध सुरूच होता. बालाजी कैलास उबाळे (वय १८) आणि योगेश गोविंद उबाळे (वय १७) असे वाहून गेलेल्यांची नावे असून दोघे गाडेगाव येथील रहिवासी आहेत.
विरारमध्ये तिघांना वाचवण्यात यश
गणेश विसर्जनाच्या दिवशी विरारमध्ये मोठी दुर्घटना टळली. सफाळे-सुवर्ण दुर्ग रो-रो सेवेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे तिघांचा जीव वाचला. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजता, मारंबळपाडा जेट्टीवर एक कुटुंब घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी समुद्रकिनारी आले. पालिकेकडून पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांनी स्वतःच समुद्रात उतरून विसर्जन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन पुरुष व एक महिला खोल पाण्यात वाहत गेले. या घटनेची माहिती मिळताच रो-रो सेवेचे कर्मचारी फेरीबोट घेऊन तत्काळ घटनास्थळी पोहोचले. एका स्थानिक मच्छिमारानेही आपल्या बोटीने मदत केली. या संयुक्त प्रयत्नांमुळे दोघा पुरुषांना रो-रो कर्मचाऱ्यांनी वाचवले, तर वाहून गेलेल्या महिलेचा जीव मच्छीमाराने वाचवला. समुद्रातील लाटांमुळे हे तिघे सुमारे १ ते १.५ किमी आतपर्यंत वाहून गेले होते.