
गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी फलटण पोलिसांनी 'डीजे वाजवाल तर कारवाईला सामोरे जाल' असे गाजावाजा करून सांगितले होते. यावेळी कोणकोणत्या कलमाखाली कारवाई केली जाईल हेही त्यांनी सांगितले होते, पण ते होते सर्वसामान्यांसाठी! कारण प्रत्यक्षात पोलिसांनीच त्यांच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविला.
गणेश मिरवणुकीत वाजलेले डीजे कमी होते म्हणून की काय पोलिसांनी पोलिस ठाण्यातील गणपती बाप्पांचे विसर्जन करताना रविवारी सायंकाळी फलटण पोलिस ठाण्यापासून निघालेल्या मिरवणुकीत स्वतःच डीजे लावून कर्णकर्कश गाण्यांवर नाचण्यासाठी ताल धरला होता, हे पाहून नागरिकांनी मात्र कपाळावर हात मारला.
उल्लेखनीय म्हणजे, फलटणच्या पोलिसांनी डीजेविरोधात कारवाई करावी, यासाठी समाज माध्यमांवर घेतलेल्या मतदानात ७३ टक्के नागरिकांनी कौल दिला होता. पण, पोलिसांनीच नियम धाब्यावर बसवले आणि फलटण पोलिसांची डीजे व लेझर लाईटविरुद्ध कारवाई करण्याची घोषणा हवेतच विरली. दुसऱ्या दिवशी स्वतः पोलिसांनीच डीजेच्या तालावर आवाजाची मर्यादा पायदळी तुडवली असून यापुढे आजून काय काय पहायला मिळणार आहे ? अशी विचारणा फलटणचे नागरीक करीत आहेत.