पेणच्या गणेशमूर्तींना मिळणार जीआय मानांकन

पेणमधून दरवर्षी ४० लाख गणेशमूर्ती देश-विदेशात पाठविल्या जातात. यात १०० कोटी रुपयांची उलाढाल
पेणच्या गणेशमूर्तींना मिळणार जीआय मानांकन

पेण येथील गणेशमूर्तींना आता जीआय मानांकन मिळणार आहे. त्यामुळे पेणच्या गणेशमूर्तींची हुबेहूब नक्कल करून ती मूर्ती पेणची असल्याचे सांगून गणेशभक्तांची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

पेणमध्ये तयार होणाऱ्या गणरायाच्या मूर्तींना भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळण्यासाठी चेन्नईच्या जीआय नोंदणी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. जीआय मानांकन मिळाल्यानंतर पेणमध्ये तयार होणाऱ्या गणेशमूर्तींना एक वेगळी ओळख मिळेल. पेणच्या गणेशमूर्तींना जीआय मानांकन मिळण्यासाठी ग्रेट मिशन ग्रुप आणि जिल्हा उद्योग केंद्राने पाठपुरावा सुरू केला आहे. याचा फायदा जागतिक स्तरावर होणार आहे. जगभरातून पेणच्या गणेशमूर्तींना जास्त प्रमाणात मागणी वाढेल. त्यामुळे भक्तांना पेणच्या कलाकारांनी बनवलेली खरी मूर्ती मिळेल, तर गणेश मूर्तिकारांना मागणी वाढल्याने चांगला मोबदला मिळू शकेल.

सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीव काम, डोळ्यांची रचना आणि रंगकामामुळे स्वत:ची खास ओळख असणारे पेणचे गणपती हा सातासमुद्रापल्याड पोहोचले आहेत. पेण शहर व तालुक्यातील विविध गावांमध्ये घराघरात गणेशमूर्ती बनविल्या जातात. गणेशोत्सवाचे १० दिवस आणि पितृपक्षातील १५ दिवस सोडले, तर वर्षभर त्या ठिकाणी गणेशमूर्ती बनवण्याचे काम चालते. पेणमध्ये ४५० गणपती मूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. साचे, मातीकाम, आखणी, आकार, आसन, अलंकार, डोळे करणी, हातातील आयुधे, बैठकीचे आसन-सिंहासन, महिरप तसेच बालमूर्तीपासून सार्वजनिक मूर्तीपर्यंतची विविध आकारातील मांडणी हे या पेणचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे येथील मूर्तींना भाविकांची मोठी मागणी आहे.

वर्षभरात ३२ लाख मूर्तींची निर्मिती

पेणमधून दरवर्षी ४० लाख गणेशमूर्ती देश-विदेशात पाठविल्या जातात. यात १०० कोटी रुपयांची उलाढाल होते. इतर ठिकाणचे काही मूर्तिकार याचा गैरफायदा घेत आहेत. अन्य ठिकाणी बनविलेल्या मूर्तीदेखील पेण येथील गणपती मूर्ती असे सांगून विक्री करून गणेश भक्तांची फसवणूक केली जात आहे. जीआय मानांकन मिळाल्यास भाविकांची फसवणूक टळेल, असे रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गु. श. हरळय्या यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in