गणेशोत्सवात सजावटीचा नवा ट्रेंड; यंदा LED, इको-फ्रेंडली मखर अन् कृत्रिम फुलांना पसंती

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबईतील सजावटीच्या बाजारपेठा नव्या ट्रेंडने खुलल्या आहेत. यंदा पारंपरिक थर्माकोलच्या मखरांना मागे टाकत पीव्हीसी फोम, लाकूड, कागद आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून बनविलेल्या इको-फ्रेंडली मखरांना मोठी मागणी आहे.
गणेशोत्सवात सजावटीचा नवा ट्रेंड; यंदा LED, इको-फ्रेंडली मखर अन् कृत्रिम फुलांना पसंती
गणेशोत्सवात सजावटीचा नवा ट्रेंड; यंदा LED, इको-फ्रेंडली मखर अन् कृत्रिम फुलांना पसंती
Published on

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबईतील सजावटीच्या बाजारपेठा नव्या ट्रेंडने खुलल्या आहेत. यंदा पारंपरिक थर्माकोलच्या मखरांना मागे टाकत पीव्हीसी फोम, लाकूड, कागद आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून बनविलेल्या इको-फ्रेंडली मखरांना मोठी मागणी आहे. तसेच एलईडी बॅकलिट डेकोरेशन, डिजिटल लाईटिंग, कृत्रिम फुलांचे भव्य बॅकड्रॉप आणि थीम-आधारित सजावट हे यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

मुंबईतील लालबाग, परळ, लोअर परळ, दादर, भुलेश्वर, क्रॉफर्ड मार्केट आणि बोरिवली येथील बाजारपेठांमध्ये सजावटीच्या साहित्याची मोठी रेलचेल दिसून येत आहे. विशेषतः पर्यावरणपूरक सजावटीवर भर देणाऱ्या विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढली आहे. यंदा कमळ, अयोध्या मंदिर, कैलास पर्वत, शिवकालीन किल्ले आणि आध्यात्मिक थीमवर आधारित मखरांना मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

बाजारात जाऊन साहित्य खरेदीस प्राधान्य

सजावटीच्या साहित्यामध्ये एलईडी पडदे, सेन्सरवर चालणारी प्रकाशयोजना, कृत्रिम फुलांच्या कमानी, मोत्यांचे हार, सजावटीची तोरणे, फिरते दिवे आणि आकर्षक बॅकड्रॉप यांची विक्री वाढली आहे. ऑनलाइन खरेदीचे पर्याय उपलब्ध असले तरी बहुतांश ग्राहक प्रत्यक्ष बाजारात जाऊन सजावटीचे साहित्य खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. मुंबईत सजावटीच्या साहित्याकरिता लालबाग, लोअर परळ, बोरिवली व मुलुंड यांसारख्या ठिकाणी विविध प्रकारच्या आधुनिक आणि पर्यावरणपूरक सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे.

पारंपरिकता, आधुनिकता यांचा संगम

यंदा गणेशमूर्तींमध्येही पर्यावरणपूरकतेचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. शाडू मातीच्या मूर्ती, पुनर्वापर करता येणारे साहित्य आणि पर्यावरणास पूरक रंगांचा वापर वाढला असून महानगरपालिकेकडूनही इको-फ्रेंडली रंगांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. विशेष म्हणजे, घरगुती गणपतींसाठी ५०० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध असून, मोठ्या मंडळांसाठी एलईडी व थीम-आधारित सजावटीवर लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पारंपरिकता, भावभक्तीबरोबरच आधुनिक प्रकाशयोजना आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या संगमामुळे अधिक आकर्षक ठरणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in