

मुंबई : ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळांनी भाविकांना देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी. भाविकांना शुद्ध आणि भेसळमुक्त प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचे पालन होण गरजेचे असून यासाठी मंडळांनी मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा’, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यस्थेबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी फटाके, ध्वनिक्षेपक आदींच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि शिस्त कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
शिस्त, सलोख्याचे करा पालन : एकनाथ शिंदे
गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केले. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी पोलीस, महापालिका तसेच संबंधित विभागांनी नियोजन केले असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.