गणेशोत्सव आता ‘राज्य उत्सव’! लवकरच राज्य सरकार करणार घोषणा

गणेशोत्सवात ऑपरेशन सिंदूर सन्मानार्थ देखावा, पर्यावरणपूरक, सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन देखील मंत्री शेलार यांनी यावेळी गणेशोत्सव मंडळांना केले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : लाडक्या गणरायाचे आगमन यंदा २७ ऑगस्ट रोजी होणार असून आता यापुढे गणेशोत्सव हा महाराष्ट्र ‘राज्य उत्सव’ म्हणून साजरा केला जाईल. राज्य शासन लवकरच याबाबतची घोषणा करेल, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. तसेच बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन जलस्रोत प्रदूषित न होता करण्यात येईल, अशी माहिती लवकरच न्यायालयात सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गणेशोत्सवात ऑपरेशन सिंदूर सन्मानार्थ देखावा, पर्यावरणपूरक, सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी गणेशोत्सव मंडळांना केले. भाजप आमदार हेमंत रासने यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्याला उत्तर देताना शेलार यांनी ही माहिती दिली.

“सामाजिक बांधिलकी, एकोपा, सगळ्यांनी संघटित व्हावे, या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ मध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यावेळेपासून देशात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. पुण्यातील कसबा गणपती भक्तांचे श्रद्धास्थान असून देशविदेशातील भक्त गणेशोत्सवात कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. पुण्यातच नव्हे तर मुंबई, ठाणे, नाशिक आदी ठिकाणी बाप्पाचे दर्शन व आकर्षक देखावा पाहण्यासाठी लोक येत असतात. त्यामुळे पुण्यातील रस्ते चकाचक होणे गरजेचे आहे. महिलांसाठी आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात यावा, शौचालय आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा,” अशी मागणी सदस्य हेमंत रासने यांनी यावेळी केली. गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो, जगातील १७० हून अधिक देशात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे पंढरपूरच्या धर्तीवर गणेशोत्सवाचे नियोजन करावे, अशी मागणी रासने यांनी यावेळी केली.

“गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘महोत्सव’ म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल. मात्र गणेशोत्सवाच्या परंपरेला बाधा आणण्यासाठी काही लोक न्यायालयात गेले. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी १०० वर्षांची परंपरा खंडित केली आणि लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना होऊ दिली नाही. परंतु महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी मधले अडथळे दूर केले. २०१४ पासून गणेशोत्सवातील सगळे स्पीडब्रेकर हटवले. मुंबई, पुणे तसेच कसबा गणेशोत्सवात निधी कमी पडणार नाही,” अशी ग्वाहीही मंत्री आशीष शेलार यांनी यावेळी सभागृहाला दिली.

logo
marathi.freepressjournal.in