संभाजीनगरमध्ये मोठा अनर्थ टळला; गॅस टँकरला अपघात, गळतीमुळे शहरात घबराट: प्रशासनाची धावाधाव

शहरात गुरुवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास गॅसचा टँकर सिडको उड्डाणपुलाच्या भिंतीवर आदळला.
संभाजीनगरमध्ये मोठा अनर्थ टळला; गॅस टँकरला अपघात, गळतीमुळे शहरात घबराट: प्रशासनाची धावाधाव

छत्रपती संभाजीनगर : शहरात गुरुवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास गॅसचा टँकर सिडको उड्डाणपुलाच्या भिंतीवर आदळला. त्यामुळे गॅस गळती झाल्याने संपूर्ण शहरवासीयांचा श्वास काहीकाळ रोखला गेला. मात्र, अग्निशमन दल आणि पोलिसांसह सर्व बचाव यंत्रणा वेळीच घटनास्थळी हजर झाल्याने मोठा अनर्थ टळला.

तब्बल साडेसतरा हजार मेट्रिक टन वजनाचा गॅस घेऊन जाणारा टँकर सिडको उड्डाणपुलाजवळ नाईक कॉलेजसमोर गुरुवारी सकाळी सव्वापाचच्या सुमारास दुर्घटनाग्रस्त झाला. या टँकरचा पत्रा तुटल्याने गॅस गळती सुरू झाली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. टँकरचालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या गुड मॉर्निंग पथकाला या अपघाताची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. के. सातोदकर यांनी अपघाताची माहिती वरिष्ठांना कळवली. परिसरातील नागरिकांना सूचना दिल्या आणि कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय बंद ठेवून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना केली. दोन ते तीन किमी परिसराला गॅस गळतीचा धोका असल्याने प्रचंड घबराट पसरली होती. पोलिसांनी या चौकाकडे येणारे सर्व रस्ते बंद केले. तसेच वीज प्रवाहही खंडित केला.

एक किमी अंतरातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले. नागरिकांनी घरात गॅस पेटवू नये, ज्वलनशील कोणतेही पदार्थ पेटवू नयेत, अशाही सूचना देण्यात आल्या. अग्निशमन दलाने तत्काळ महापालिकेचे आठ बंब घटनास्थळी आणले आणि टँकरवर पाण्याचा मारा सुरू केला. त्याचबरोबर गरवारे कंपनीचा १, एमआयडीसी १, बजाज कंपनीचा १ असे ११ अग्निशमन बंब दुर्घटनाग्रस्त टँकरवर पाण्याचा सतत मारा केला. पहिल्या पाच तासांतच जवळपास १०० टँकरमधून पाण्याचा मारा करण्यात आला. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नवनीत कावट, वाहतूक उपायुक्त अशोक थोरात यांच्यासह महापालिकेची रेस्क्यू टीम तेथे ठाण मांडून होती.

उद्योग नगरीची मदत

अपघाताची माहिती मिळताच गरवारे कंपनीने आपली सुरक्षा टीम घटनास्थळी पाठवली. अग्निशमन दलाचा बंब आणि पाण्याचे टँकर मदतीसाठी दिले. बजाज कंपनीनेही आपली तज्ज्ञांची टीम, अग्निशमन बंब तात्काळ पाठवला. याचबरोबर चिकलठाण्यातील ग्रीव्हज कंपनीने आपले अधिकारी अनिल पवार यांच्यासह अॅम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना केली. घटनेचे गांभीर्य पाहता उद्योगनगरीतील अनेक कंपन्यांनी आपले तज्ज्ञ आणि सुरक्षारक्षक पाठवले आहेत. दरम्यान, या दुर्घटनाग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यासाठी तज्ज्ञांचे पथक जळगावहून बोलावण्यात आले. हे पथक आल्यानंतर हा गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in