
सुजित ताजणे/छत्रपती संभाजीनगर
दरवर्षी मोठ्या उत्साहात चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होताच त्यापाठोपाठ ज्येष्ठा-गौरीचे आगमन होते. ही परंपरा यावर्षीही कायम ठेवत घरोघरी सोन पावलांनी गौराईचे आगमन रविवारी (दि. ३१) होणार आहे. गौराई आली सोन्याच्या पावलांनी... गौराई आली माणिक मोतींच्या पावलांनी... असे म्हणत लाडक्या गौराईची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. घरोघरी त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. बाजारही फुलला असून महिला वर्गाची मोठी लगबग दिसून येत आहे. खरेदीची धूम आहे. गौराईच्या आगमनाच्या निमित्ताने महिलांनी जोरदार तयारी केली आहे. पारंपरिक पद्धतीने रांगोळी काढून तोरण लावूनः गौरीच्या स्वागत करण्यात येणार आहे. घरोघरी रांगोळीने लक्ष्मीचे पावले काढून फुलांची उधळण करत गौरीचे स्वागत करण्यात येईल. उद्या सर्वत्र घरोघरी गौरीचे आगमन होईल.
लाडू, करंजी, शेव, शंकरपाळे आदी फराळांची रेलचेल
त्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यासाठी विविध प्रकारचे फराळ तयार केले आहे. त्यात विविध प्रकारचे लाडू, करंजी, शेव, शंकरपाळे, चिवडापासून आदी फराळ बनविण्यासाठी महिलांनी मेहनत घेतली आहे. तर काहींनी रेडिमेड फराळ खरेदीवर भर दिला जात आहे. तसेच केवडा सुगंधी विविध फुले देखील खरेदी केले जात आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीची धूम आहे, असे विक्रेता भारत रायमाने यांनी सांगितले.
सोळा भाज्यांचा नैवेद्य
महालक्ष्मीसाठी सोळा भाज्या चटण्या कोशिंबिरी यांचा समावेश असतो. गौराईसाठी नैवेद्य म्हणून सोळा भाज्या बनविण्याची परंपरा आहे. त्यामुळे बाजारात सोळा भाज्या खरेदीवर भर दिला जात आहे. सोळा भाज्यांमध्ये गवार, दोडके, पडवळ, बिन्स, डांगर, चिक्की, फ्लवर, पत्ता गोबी, गळके, चवळी, भेंडी, कारले, दुधी भोपळा, वांगे, लाल भोपळा, पालक, चुका, अंबाडा, मेथी, आंबट चुका या भाज्या खरेदीवर भर दिला जाणार आहे.