"अजित दादा‌ला‌ आमच्या बोकांडी बसवलाय, त्यांना महायुतीतून बाहेर काढा" आमदार राहुल कुल यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यानं व्यक्त केला संताप

अजित दादांना महायुतीतून बाहेर काढा...भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोर भाजपच्या एका कार्यकर्त्यानं संताप व्यक्त केला आहे.
"अजित दादा‌ला‌ आमच्या बोकांडी बसवलाय, त्यांना महायुतीतून बाहेर काढा" आमदार राहुल कुल यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यानं व्यक्त केला संताप
Published on

पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं ३० जागांवर विजय मिळवला. तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं. निवडणूकीपूर्वी ४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. लोकसभेच्या निकालानंतर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. त्यातही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीतील सहभागावरून भाजपमधील अनेक नेते तसेच कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपच्या लोकसभेतील पराभवाला अजित पवार गट कारणीभूत भावना अनेक भाजप कार्यकर्त्यांची आहे. हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच इंदापूर आणि दौंड येथील कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यानं आमचं वाटोळं झालं, असं एका कार्यकर्त्यानं म्हटलं आहे. त्याचबरोबर अजितदादांना आमच्या बोकांडी मारलं, असंही तो म्हणाला. सुदर्शन चौधरी असं या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे.

भाजप कार्यकर्ता अजित दादांवर संतापला...

भाजप आमदार राहुल कूल यांच्यासमोर सुदर्शन चौधरी यानं आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, "कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय? खरंच जर निर्णय घेणार असाल तर अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा. त्यांनी सुभाषबापू, राहुलदादा, योगेश दादांवर यांच्यावर अन्याय केलाय त्यांनी. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेकांना महामंडळ मिळालं असतं. अजित दादा असेल तर आपल्याला विधानसभेची सत्ता नको. पुणे जिल्हा आणि सोलापूरचीही तीच अवस्था आहे. स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये. या जिल्ह्यातील लोकांचे हाल झालेत. ज्या राष्ट्रवादीशी गेल्या १०-१० वर्षांपासून आम्ही विरोध करतोय, ते अजितदादा आमच्या बोकांडी दिलेत. आणि अक्षरशः कार्यकर्ते आज भीतीच्या वातावरणात आहेत. बुथ लेव्हलपासून ते तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत सर्वांची इच्छा आहे, महायुतीत अजित दादा असतील आणि विधानसभेत आपली सत्ता येणार असेल, तर ती सत्ता आपल्याला नको. अजित दादांसाठी सत्ता आणायची का? त्यांनी पालकमंत्री व्हायचं. आदेश द्यायचे आणि भाजप कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचं. असली सत्ता आम्हाला नकोय."

ही अंतर्गत चर्चा, व्हिडिओ रेकॉर्ड करणं चुकीचं...

या व्हायरल व्हिडिओनंतर आमदार राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "लोकसभा निवडणूकीनंतर ही बैठक विश्लेषणासाठी घेतली होती. यामध्ये कोणतंही रेकॉर्डिंग अलाउड नव्हतं आणि हा विषय पब्लिक प्लॅटफॉर्मवर करायचा नसल्यानं ही अंतर्गत चर्चा होती. अंतर्गत चर्चेदरम्यान केलेलं हे रेकॉर्डिंग आहे. ते अधिकृत नाही. कार्यकर्त्यांची ही भावना आहे. ही पक्षांतर्गत कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यात रेकॉर्डिंग करणं योग्य नव्हतं."

logo
marathi.freepressjournal.in