राज्यातील प्रत्येक प्रकल्पाची अपडेट मिळणार; ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ सेवेत दाखल

राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांची सध्या काय स्थिती, किती टक्के काम पूर्ण, प्रकल्पाची फाईल कुठे या ७० हून अधिक चार लाख कोटींच्या प्रकल्पाची अपडेट आता मुख्यमंत्र्यांना ‘मुख्यमंत्री वॉर रूम’च्या माध्यमातून मिळणार आहे.
राज्यातील प्रत्येक प्रकल्पाची अपडेट मिळणार; ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ सेवेत दाखल
@mieknathshinde/X
Published on

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांची सध्या काय स्थिती, किती टक्के काम पूर्ण, प्रकल्पाची फाईल कुठे या ७० हून अधिक चार लाख कोटींच्या प्रकल्पाची अपडेट आता मुख्यमंत्र्यांना ‘मुख्यमंत्री वॉर रूम’च्या माध्यमातून मिळणार आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, फाईल पुढे पाठवणे आदी कामे जलदगतीने व्हावी, हा ‘मुख्यमंत्री वॉर रूम’चा मुख्य उद्देश आहे. मंत्रालयातील सातव्या मजल्यावर कॉर्पोरेट लूक असलेल्या ‘मुख्यमंत्री वॉर रूम’चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी सुमारे २०० हून अधिक बैठका आयोजित केल्या आहेत.

राज्यातील प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या डॅशबोर्ड, प्रकल्पाची फाईलची सद्यस्थिती, ज्या विभागाकडे प्रलंबित आहे, त्या विभागाला जाणारी नोटिफिकेशन आदींबाबत माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतली.

१६५ तक्रारींचे निवारण

‘सीएम वॉर रूम’ला आजपर्यंत विविध प्रकल्पांशी संबंधित सुमारे ३५० समस्या प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १६५ समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.

वॉर रूमचा उपयोग

  • राज्यातील १५ क्षेत्रातील विविध ७४ प्रकल्पांच्या विविध टप्प्यांवरील कामाचा आढावा.

  • प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा, निधी देणारी यंत्रणा यांच्यामधे समन्वय.

  • एक्झिक्युटिव्ह, सेक्टरल आणि प्रोजेक्ट डॅशबोर्डची निर्मिती, या डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रकल्पाच्या प्रत्येक क्षेत्रातील कामाचे मूल्यमापन.

  • प्रकल्पाला गती मिळण्यासाठी त्यामधील प्रश्न सोडविण्याकरिता सबंधित विभागाला नोटिफिकेशन आणि अलर्ट देण्याची सुविधा.

  • प्रकल्पामधील अडचणी दूर करण्यासाठी ‘रिअल टाईम मॉनिटरिंग’ व्यवस्था.

  • प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरणारे प्रश्न सोडविण्यासाठी विभागांमध्ये प्रभावी समन्वय व ट्रॅकिंग यंत्रणेचा विकास.

logo
marathi.freepressjournal.in