अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तावरुन महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. सलीम कुत्ताचे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत असलेल्या फोटोवरुन शिवसेना ठाकरे गटावर टीका केली जात होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे सलीम कुत्ता प्रकरण आणखीच ऐरणीवर आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी विधान परिषदेत फोटो दाखवत महाजन यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गिरीश महाजन यांचे सलीम कुत्ताशी संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दहशतवाद विरोधी गु्न्हे दाखल करावे. ग्रामविकास मंत्री यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. जर बडगुजर यांचे नाव घेतले जाते मग गिरीश महाजन यांचे नाव का घ्यायचे नाही? महाजन यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी एकनाथ खडसे यानी विधान परिषदेत केली आहे. या प्रकणाची एसआयटी चौकसी करण्याचे आदेश विधानपरिषदेचे उपसभापती निलम गोऱ्हे यांनी द्यावेत, असे आम्हाला वाटते. सरकारने तात्काळ कारवाई करावी. बॉम्ब स्फोटाशी संबंधित गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी खडसे यांनी विधान परिषदेत केली आहे.
खडसे यांनी केलेल्या मागणीनंतर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबतचे फोटो एकनाथ खडसे यांनी दाखवू नयेत असे निर्देश दिले. त्यांनी खडसे यांनी मांडलेली २८९ ची चर्चा फेटाळली. दरम्यान, ज्या व्यक्तीचे सभागृहात नाव घेण्यात आले आहे, तो कुठेही जेवताना दिसत नाही. परंतु एका पक्षाचा महानगर प्रमुख हा नाचताना पहायला मिळत आहे. या ठिकाणी विनाकारण एका मंत्र्यांचा उल्लेख करण्यात आला तो तात्काळ काढावा, अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.