'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर बलात्कार; स्वारगेट बसस्थानकातील घटनेने पुणे हादरले, ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये आरोपीची ओळख पटली

दिल्लीतील 'निर्भया' बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या स्मृती अद्यापही ताज्या असतानाच बुधवारी पहाटे स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या 'शिवशाही' बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ माजली आहे.
'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर बलात्कार; स्वारगेट बसस्थानकातील घटनेने पुणे हादरले, ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये आरोपीची ओळख पटली
Published on

पुणे : दिल्लीतील 'निर्भया' बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या स्मृती अद्यापही ताज्या असतानाच बुधवारी पहाटे स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या 'शिवशाही' बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ माजली आहे. या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत.

पीडित तरुणीने स्वारगेट पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यामध्ये आरोपी कोण आहे ते स्पष्ट झाले. या आरोपीचे नाव दत्तात्रेय रामदास गाडे (३५)असे असून, तो ‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

पीडित मुलगी पुण्यात काम करते. ती सातारा येथे तिच्या गावाला जात होती. सकाळी साधारण पावणेसहाच्या सुमारास ती बसची वाट बघत होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ गेला आणि तिच्याशी काही तरी बोलत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. त्यानंतर तिच्या शेजारचा माणूस उठून निघून गेल्याचे दिसत आहे. आरोपीने गोड बोलून तिच्याशी ओळख करुन घेतली आणि ‘ताई’ कुठे जायचे आहे, असे विचारले त्यावर मुलीने फलटणला जायचे आहे, असे सांगितले. तर त्याने तिला बस इथे नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते, असे सांगून ‘चल मी तुला त्या बसमध्ये बसवतो, असे सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी आरोपीसह बसजवळ जाताना दिसते आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

अंधाराचा फायदा

स्मार्तना पाटील पुढे म्हणाल्या, बसमध्ये अंधार होता, त्यावर ती आरोपीला म्हणाली की ‘या बसमध्ये तर अंधार आहे’. तर आरोपी तिला म्हणाला ‘ही बस रात्री आली आहे. लोक झोपले असतील म्हणून अंधार आहे. तुला हवे तर बसमध्ये चडून तू टॉर्च लावून तपासून घे’, असे सांगितले. सदर तरुणी त्याच्यावर विश्वास ठेवून अंधार का आहे हे बघायला आतमध्ये गेली. तेव्हा आरोपी तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला त्याने बसचा दरवाजा लॉक केला आणि तिच्यावर बळजबरी करीत बलात्कार केला. त्यानंतर आरोपी उतरुन गेल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तसेच मुलगीही उतरली आणि दुसऱ्या बसने गावी जायला निघाली होती. यादरम्यान तिने अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर हा सगळा प्रकार मित्राला सांगितला. मित्राने तिला पोलिसांत तक्रार करण्यास सांगितल्यानंतर ती बसमधून उतरून स्वारगेट पोलीस ठाण्यात आली व तिने पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले.

पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून वेगवेगळ्या पथकांमार्फत शोधमोहीम सुरू केली आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर एसटी स्थानक परिसरातील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज यामुळे अधोरेखित झाली आहे.

‘शक्ती’ कायदा त्वरित लागू करा - रोहित पवार

या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी करतानाच महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा ‘शक्ती’ कायदा राज्यात तत्काळ लागू करण्याबाबत राज्य सरकार आता तरी निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

घटना धक्कादायक - चाकणकर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसे पाहिले तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असते. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. सकाळी ही घटना घडली. संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. त्यानंतर मुलीने सकाळी साडेनऊ वाजता पोलिसांत तक्रार नोंदवली. यात पोलिसांकडून जातीने लक्ष घातले जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेने केलेल्या वर्णनानुसार माहिती गोळा केली जात आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तयार केली असून, ग्रामीण भाग आणि स्वारगेट भागात तपास सुरू आहे. आरोपीचा सीडीआर काढला आहे, लोकेशननुसार त्याचा माग काढला जात आहे, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

बसगाड्यांचे झालेय लॉजिंग - वसंत मोरे

वसंत मोरे यांनी या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आगारातील कर्मचाऱ्यांवर, सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप केले. ‘या लोकांनी चार बसगाड्यांचे लॉजिंग केले आहे. याचा अर्थ असा होतो की याच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत इथे रोज बलात्कार होतात. येथील बंद पडलेल्या बसमध्ये निरोधची पाकिटे, साड्या, अंतवस्त्रे पडलेली दिसतात. मीडियाने सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर कळेल, आगाराच्या मागच्या बाजूला या बसेस ठेवल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी घडणाऱ्या गैरकृत्यांमागे या लोकांचाच हात आहे.

आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही - अजित पवार

स्वारगेट बसस्थानकार घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. आरोपीचा गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. याप्रकरणी पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला आहे. मी स्वत: पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिश: लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत, असे पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बस स्थानकातील २३ सुरक्षारक्षक निलंबित

स्वारगेट बसस्थानक परिसरातील बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली असून, स्वारगेट बस स्थानकातील २३ सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यामार्फत विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे, असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी ) विवेक भीमनराव यांना दिले आहेत. तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी उद्या एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलाविण्याचे निर्देश देखील सरनाईक यांनी दिले आहेत.

कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर -सपकाळ

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्री केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ‘लाडकी बहीण’ म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करीत आहे, या घटनेने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत, असे सपकाळ म्हणाले. काही दिवसांपूर्वी शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता, त्यामागील सत्य बाहेर येऊ नये यासाठी सरकारने आरोपीचा एन्काउण्टर केला आणि मुख्य आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. पुण्याची घटना गंभीर आहे, सरकार बेफिकीर असल्यानेच राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असे सपकाळ म्हणाले.

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा - सुप्रिया सुळे

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवरून सरकारला जाब विचारला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरून ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शवणारी आहे.

logo
marathi.freepressjournal.in