युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे - लोढा

शाळा, महाविद्यालयांतून ३ जुलैपासून सुरुवात
युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे - लोढा
Published on

राज्यातील तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात ३ लाख ५० हजार शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून ३ ते १५ जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील सर्व तालुक्यांत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. मुलींसाठी स्वसंरक्षणाचा समावेश शालेय अभ्यासक्रमातच करण्यात यावा यासाठी शालेय शिक्षण विभागाला विनंती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे क्रूर हिंसाचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या, हे शासन व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खुपच आवश्यक आहे. राज्य सरकार त्यासाठी विविध उपाययोजना करत आहेच, पण त्याचसोबत महिला व बालविकास विभागाने देखील त्यासाठी पुढाकार घेतला आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आयुक्त, महिला व बालविकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापिठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबिरांचे आयोजन करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.

युवतींचे मनोबल उंचावण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. भारतीय स्त्री शक्ती संस्था यासाठी मदत करणार आहे. ही स्वयंसेवी संस्था असल्याने ही मदत पूर्णपणे मोफत असणार आहे. राज्यातील इतरही स्वयंसेवी संस्था पुढे आल्यास त्याचे स्वागतच असेल, असेही ते म्हणाले.

अभ्यासक्रमात समावेश व्हावा

मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण कायम मिळावे यासाठी त्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमातच व्हावा, यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. शालेय शिक्षण विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण विनंती करून पाठपुरावा करू, असेही मंगलप्रभात लोढा म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in