

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे तब्बल १८.४८७ टीएमसी क्षमतेचे गिरणा धरण हे रविवारी मध्यरात्री पूर्ण क्षमतेने भरले असून यामुळे जळगाव जिल्ह्यातील सहा, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव या दोन तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी यंदा दिलासा मिळाल आहे. ५६ वर्षांत हे धरण केवळ १४ वेळा पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी दिली. दरम्यान धुळे जिल्ह्यातील सहा प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे गिरणा नदीवर असलेले हे धरण १९६९ मध्ये बांधून पूर्ण झाले. या धरणात नाशिक जिल्ह्यातील चणकापूर व पुनद या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असतो. या धरणांची साठवण क्षमता २१ हजार ५०० द.ल.घ.फु. आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पाचोरा, धरणगाव व जळगाव हे तालुके व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व नांदगाव हे तालुके धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. सात नगरपालिका, मालेगाव पालिका, १७२ गावे यांना या धरणाचा लाभ होतो. तासा ६० हजार हेक्टर शेती क्षेत्राला याचा लाभ होतो. धरण पूर्ण भरल्याने आता पिण्याच्या पाण्यासाठी तीन, तर सिंचनासाठी दोन असे पाच आवर्तन सोडले जातील असे विनोद पाटील यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यातील ६ प्रकल्प भरले
धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, मुकटी हे सहा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तर अक्कलपाडा ९३ टक्के, वाडी शेवाडी ६० टक्के, करवंद ८७ टक्के भरलेले आहे. यामुळे धुळे जिल्ह्याला देखील दिलासा मिळाला आहे.