जळगाव : जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीतील सुमारे आठ टीएमसी वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून सात बलून बंधारे बांधण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र ही योजना अत्यंत खर्चिक व अव्यवहार्य असल्याचे लक्षात आल्याने आता बलून बंधाऱ्यांची कल्पना मागे पडली असून त्याऐवजी साधे बॅरेजेस बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. हे बॅरेजेस बलून बंधाऱ्यांपेक्षा कमी खर्चात होणार असल्याचे सांगितले जात आहे.
गिरणा धरणातून पाणी सोडून गावांची तहान भागवली जाते. मात्र १६८ किमीचा प्रवास करताना गिरणा नदीतील तब्बल आठ टीएमसी पाणी वाहून जाते. हे पाणी ठिकठिकाणी अडवले गेले तर सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. गेल्या तीस वर्षांपासून जलसंपदा विभागाच्या निदर्शनास ही बाब वारंवार आणून देण्यात आली असली तरी लोकप्रतिनिधींनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सन २००० पासून गिरणा नदीचे पाणी अडवण्याचा विषय चर्चेत आला. त्यावेळी परदेशी तंत्रज्ञान वापरून बलून बंधारे बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सात ठिकाणी असे बंधारे उभारल्यास मोठ्या प्रमाणात पाणी अडवता येईल, असा दावा करण्यात आला. मात्र हे बंधारे अत्यंत खर्चिक असल्याने केंद्र सरकारने आर्थिक सहाय्य देण्यास नकार दिला आणि हा प्रस्ताव पुढे सरकला नाही.
बलून बंधाऱ्यांऐवजी साधे बॅरेजेस उभारण्याचा विचार पुढे आला. नोव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होण्याच्या अटीवर गिरणा नदीवर सात मध्यम प्रकल्पांना तत्वत: मान्यता दिली. त्यानंतर राज्य शासनाने २८ डिसेंबर २०१८ रोजी ७११.१५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली. या प्रकल्पाचा १०० टक्के खर्च केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यातून करण्याची अटही ठेवण्यात आली. प्रस्तावित बॅरेजेस चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे व बहाळ, भडगाव तालुक्यातील पांढरद व भडगाव, पाचोरा तालुक्यातील परधाडे व कुरंगी तसेच जळगाव तालुक्यातील कानळदा येथे उभारण्याची योजना आहे.
या सात बॅरेजेसमुळे सुमारे २१.४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण होणार असून ४४३२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार आहे. २०१८ मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पाची सुधारित किंमत १२०५ कोटी रुपये झाली आणि सध्या ती १८०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मात्र प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. या योजनेसाठी केंद्राकडून १०० टक्के निधी देण्याची कोणतीही योजना नसल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. १९७२ मध्ये गिरणा नदीवर नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्याची सूचना देण्यात आली होती. काहींनी तो बांधून देण्याचा प्रस्तावही दिला होता, मात्र तो मान्य झाला नाही.
प्रकल्प कागदावरच
सुरुवातीला ७११ कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प सुधारित अंदाजानुसार १८०० कोटी रुपयांवर गेला असला तरी अद्याप तो कागदावरच आहे. जळगाव जिल्ह्यात गिरणा धरणापासून ते गिरणा नदी तापीला मिळते, त्या ठिकाणापर्यंतचे अंतर सुमारे १६८ किलोमीटर आहे. या अंतरामध्ये चार लहान बंधारे वगळता गिरणा नदी कोठेही अडवलेली नाही. गिरणा नदीच्या पाण्यावर सात तालुके, १० नगरपालिका, १३० पाणीपुरवठा योजना आणि १७४ गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. याशिवाय शेतीसाठीही या पाण्याचा वापर होतो.
अवैध वाळू व्यवसायाला पाठबळ ?
गेल्या पन्नास वर्षांपासून गिरणा नदीचे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असतानाही ते अडवण्याबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ठोस प्रयत्न केले नाहीत. टप्प्याटप्प्याने बंधारे बांधले असते तर वीस वर्षांपूर्वीच सातहून अधिक बंधारे उभे राहिले असते आणि मोठ्या प्रमाणात पाणी साठवता आले असते. त्यामुळे खर्चातही मोठी बचत झाली असती. दरम्यान, जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गिरणा व तापी नदीतील वाळूला बाहेरील जिल्ह्यांतून मोठी मागणी असल्याने वाळू माफियांचे जाळे मजबूत झाले आहे. त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याची चर्चा असून बंधारे न उभारण्यामागे हेही एक कारण असल्याचे सांगितले जाते.
पाणी प्रश्न प्रलंबितच
सध्या गिरणा नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम सुरू असून तो ‘पूल कम बंधारा’ म्हणून उभारता येईल, अशी सूचना मांडण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याबाबत पुढाकार घेतला नाही. जर हा पूल-कम-बंधारा झाला असता तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरासह जळगाव शहराचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकला असता. मात्र वाळू माफियांच्या हिताला धक्का बसण्याची शक्यता असल्याने हा प्रस्ताव पुढे गेला नसल्याची चर्चा आहे. गिरणा नदीचे दरवर्षी वाहून जाणारे सुमारे आठ टीएमसी पाणी अडवणे ही जिल्ह्याची प्राथमिक गरज असली तरी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे हे मौल्यवान पाणी नेमके कधी अडवले जाईल, याबाबत सध्या तरी अनिश्चितता कायम आहे.