
जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास हरकत नसल्याचं म्हटलं आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवा किंवा ओबीसींचा टक्का वाढवून मराठा समाजाला ओबीसीत घ्या, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. आता यावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना फक्त १७ टक्के आरक्षण उरलं आहे. या १७ टक्क्यात ४०० जाती आहेत. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजाची अडचण होईल. ५० टक्क्यांच्या सर्व मर्यादा ओलांडून १० टक्के आरक्षण केंद्र सरकारने वाढवलं आहे. त्यात आणखी १० टक्के वाढवून मराठा, पटेल, जाट, गुज्जर समाजाला आरक्षण द्या. त्यामुळे सर्वांचा प्रश्न संपेल, असं भुजबळ म्हणाले.
नाहीतर कोणच्या वाटेला काहीही येणार नाही
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण १७ टक्के आरक्षण त्यात ५४ टक्के ओबीसी आणि मराठा समाज आल्यास कोणाच्याही वाट्याला काहीही येणार नाही. यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी आपलं मत मांडलं पाहिजे, असं देखील भुजबळ म्हणाले. ओबीसींच्या हक्कावर गदा न येता, मराठा समाजाला न्याय कसा देता येईल, याबाबतचा विचार केला पाहिजे. सगळ्यांनी दिल्लीला जाऊन बसावं. नाहीतर कोणीतरी न्यायालयात जाणार आणि तोंडाला पाणे पुसली जाणार, मग परत आंदोलन होणार, या लढाया सुरुच राहणार, असं भुजबळ म्हणाले.