

मुंबई : योजनांचा पाऊस पडला जात असून आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपची ही खेळी आहे. करदात्यांच्या पैशांची उधळण सुरू असून हा पैसा काय सरकारच्या बापाचा आहे का, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला. राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आधी आमच्या दीदींना सुरक्षा द्या. पंतप्रधान जगभर फिरतील आणि आमच्या बहिणी न्यायासाठी फिरत राहतील, अशी टीका राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी ‘लखपती दीदीं’चा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या मेळाव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
मोदी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत. युक्रेन,पोलंड, रशिया तिकडे देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला गेले होते. जळगावला देखील त्याच कामासाठी आले आहेत. निमित्त आहे लखपती दीदी. ज्या देशात लाखो बेरोजगार आहेत, त्यांना देखील लखपती करण्याची गरज आहे. महिलांना पैसे दिले जातात आणि मुख्यमंत्री विचारत आहेत पैसे मिळाले ना पैसे मिळाले ना, ही काय पद्धत झाली का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
सरकारच्या बापाच्या पैसे आहेत का? लखपती दीदी आणि जनतेचा पैसा आहे. आमच्या बहिणींच्या सुरक्षेबाबत प्रधानमंत्री यांनी अजून एकही शब्द काढला नाही. ज्या जळगावात प्रधानमंत्री जात आहेत त्याच जळगावात पंधरा दिवसात चार जणांवर अत्याचार झाला. याबाबत प्रधानमंत्र्यांना कोणीतरी जाऊन सांगा. पहिले तुम्ही आमच्या दीदींना सुरक्षा द्या. प्रधानमंत्री फिरत राहतील आणि आमच्या बहिणी न्यायासाठी इकडून तिकडे फिरत राहतील, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.