अडीच लाखांहून अधिक नवजात शिशूंना जीवनदान; नवजात निगा कक्ष ठरतेय बालकांसाठी वरदान… 

शासनाच्या रुग्णालयात बालकांवर वेळीच उपचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नवजात निगा कक्षात वर्ष २०२० ते २०२४ दरम्यान यशस्वी उपचार केल्याने २ लाख ७७ हजार ११४ बालकांना जीवनदान मिळाले आहे.
अडीच लाखांहून अधिक नवजात शिशूंना जीवनदान; नवजात निगा कक्ष ठरतेय बालकांसाठी वरदान… 
Published on

गिरीश चित्रे / मुंबई

शासनाच्या रुग्णालयात बालकांवर वेळीच उपचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नवजात निगा कक्षात वर्ष २०२० ते २०२४ दरम्यान यशस्वी उपचार केल्याने २ लाख ७७ हजार ११४ बालकांना जीवनदान मिळाले आहे. राज्य सरकारी रुग्णालयातील नवजात काळजी कक्ष बालकांसाठी वरदान ठरत आहे. नवजात काळजी कक्षामुळे नवजात शिशूंचा मृत्यू दर कमी करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला यश आले आहे.

राज्यातील अर्भक व नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे यश मिळत असल्याचे गेल्या काही वर्षांतील नवजात निगा कक्षातील (एसएनसीयू) सुविधेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने नवजात बालकांचे आजार व मृत्यू टाळण्यासाठी व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांची अंमलबजावणी राज्य व जिल्हा स्तरावरून करण्यात येते.

एसएनसीयूत दरवर्षी अंदाजे ५० हजार गंभीर आजारी बालकांवर उपचार केले जातात. २०२२ - २३, २०२३-२४  कालावधीत अत्यंत कमी वजनाच्या (१,५०० ग्रॅम पेक्षा कमी) एकूण ६,७९८ नवजात बालकांवर यशस्वीरित्या उपचार करून नवजीवन मिळाले आहे.

राज्यात ५५ एसएनसीयू

जिल्हा, महिला, उपजिल्हा रुग्णालयांत आजारी नवजात आणि कमी वजनाच्या नवजात बालकांचे व्यवस्थापन व उपचारासाठी विशेष नवजात निगा कक्ष (एसएनसीयू) ची स्थापना करण्यात आले आहे. राज्यात १८ जिल्हा रुग्णालये, १२ महिला रुग्णालये, १५ उपजिल्हा रुग्णालये, ३ सामान्य रुग्णालये, १ ग्रामीण रुग्णालय, १ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५ पालिका रुग्णालयामध्ये मिळून एकूण ५५ एसएनसीयू कार्यरत आहेत. प्रत्येक कक्षामध्ये १ बालरोग तज्ज्ञ, २ वैद्यकीय अधिकारी, १० ते १२ परिचारिका आणि ४ सहाय्यक कर्मचाऱ्यांसह किमान १२ ते १६ खाटा असून नवजात किंवा विशेष काळजी आवश्यक असणाऱ्या बालकांसाठी २४ तास सेवा दिली जात आहे. हे कक्ष रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, इन्फ्युजन पंप, सीपॅप मशिन, मॉनिटर यांसारख्या वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज आहेत.

मृत्यूदरमध्ये लक्षणीय घट

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२१-२२ या कालावधीत एसएनसीयूत ९७,३९२ बालकांना दाखल करून उपचार करण्यात आले. तसेच २०२२ - २३ ते २०२४ - २५ कालावधीत एसएनसीयूत १,७९,७२२ बालकांना दाखल करून उपचार करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत एसएनसीयूत दाखल करून उपचार केलेल्या बालकांमध्ये वाढ होत आहे. नोव्हेंबर २०२४ अखेर नवजात शिशु मृत्यू दर २०२०-२१ वर्षातील ७.५० टक्के वरून ५.०४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये एसएनसीयूतीलमधील मृत्यूदर २.४६ टक्क्यांनी कमी झाला आहे. 

logo
marathi.freepressjournal.in