
शिंदे यांच्या बंडानंतर आणि सत्ताबदल झाल्यानंतर त्यांच्या गटात सामील झालेले आमदार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना धमक्या येत आहेत. शिंदे गटाचे आमदार आणि त्यांचे गटनेते भरत गोगावले यांचा मुलगा यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या प्रकरणी विकास गोगावले यांनी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आम्हाला वारंवार धमकीचे फोन येत असल्याचे विकास गोगावले यांनी सांगितले.
विकास गोगावले यांना फोनवरून धमकी देण्यात आली. त्यावेळी त्यांना अर्वा भाषेत शिवीगाळ करण्यात आली. धमकी देणाऱ्याने ४-५ दिवसांचा इशारा दिला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विकास गोगावले यांनी सांगितले की, मला गेल्या दोन दिवसांपासून अज्ञात क्रमांकावरून धमकीचे फोन येत आहेत. माझे वडील भरत गोगावले यांनाही धमकीचे फोन येत आहेत. तुम्ही पक्ष कसा वाढवता ते आम्ही बघतो, अशा धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही या गोष्टी टाळत होतो. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आम्ही तक्रार दाखल केली आहे.
दोन दिवसांपूर्वी पुण्यात आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सामंत यांच्या कारच्या मागील खिडकीच्या काचा फुटल्या. या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई केली आहे. मात्र, हा हल्ला पूर्वनियोजित असून सुपारी देऊन करण्यात आल्याचा आरोप सामंत यांनी माध्यमांशी बोलताना केला. हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांनाही त्यांनी इशारा दिला.