गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार

गोकुळ दूध संघाने यंदा दिवाळीपूर्वी आपल्या दूध उत्पादक सभासदांना मोठी आनंदाची भेट दिली आहे. संघाने तब्बल १३६ कोटी ०३ लाख रुपये अंतिम दूध दरफरक म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.
गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार
Published on

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने यंदा दिवाळीपूर्वी आपल्या दूध उत्पादक सभासदांना मोठी आनंदाची भेट दिली आहे. संघाने तब्बल १३६ कोटी ०३ लाख रुपये अंतिम दूध दरफरक म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम १ ऑक्टोबर रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा होणार असून, यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच लाख दूध उत्पादकांना दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम गतवर्षीच्या तुलनेत २२ कोटी ३७ लाख रुपये जादा आहे.

गोकुळचे दैनिक दूध संकलन १८.५९ लाख लिटरवर गेले आहे, तर एका दिवसात विक्रमी २३.६३ लाख लिटर दूध विक्रीचा उच्चांक गाठला आहे. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये म्हैस दूध उत्पादकांना प्रतिलिटर ६० रुपये ४८ पैसे आणि गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३६ रुपये ८४ पैसे इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

चेअरमन मुश्रीफ यांनी या वेळी सर्व सभासद, ग्राहक, वितरक व कर्मचाऱ्यांना विजयादशमी व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

किती दरफरक मिळणार?

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये खालीलप्रमाणे दरफरक निश्चित करण्यात आला आहे. याप्रमाणे म्हैस दुधाला प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे, तर गायीच्या दुधाला प्रतिलिटर १ रुपये ४५ पैसे असा दरफरक दिला जाणार आहे. यासोबतच, दूध संस्थांसाठी प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे डिबेंचर्स स्वरूपात जमा केले जातील. तसेच हीरक महोत्सवी जादा दरफरक म्हणून म्हैस व गाय दुधाला प्रतिलिटर २० पैसे अतिरिक्त देण्यात आले आहेत.

दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या श्रमांचा योग्य मोबदला देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी दरफरकाची ही मोठी रक्कम आम्ही उत्पादकांच्या खात्यात जमा करत आहोत.

नविद मुश्रीफ, गोकुळचे चेअरमन

८ हजार १२ दूध संस्थांना होणार फायदा

या १३६ कोटी ०३ लाख रुपयांच्या वाटपात म्हैस दुधाकरिता ६६ कोटी ३७ लाख रुपये, तर गायीच्या दुधाकरिता ४५ कोटी १४ लाख रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम व्याज, डिबेंचर्सवरील उत्पन्न आणि डिव्हिडंडची आहे. गोकुळच्या या निर्णयाचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यासह सीमा भागातील ८ हजार १२ दूध संस्थांना होणार आहे. दरफरकासोबतच गोकुळने चालू वर्षात पशुवैद्यकीय सेवा, कृत्रिम रेतन, वैरण विकास, संगोपन अनुदान, किसान विमा अशा विविध योजनांवर ४२ कोटी रुपये खर्च केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in