

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सत्तासंघर्षाची धग रस्त्यावर पोहोचणार असून, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांनी ‘संघर्ष मोर्चा’ काढण्याचे ठरवले आहे. सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते लोकशाहीच्या रक्षणासाठी सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापूर काँग्रेस समिती कार्यालयात समविचारी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली.
‘गोकुळ’ची सत्ता बळकावण्यासाठी महायुतीने कुटील राजकारण केल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. तसेच या मोर्चात कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापूरचा स्वाभिमान आणि ताकद दाखवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हुकूमशाही मोडून काढून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारला धडकी भरवणारा मोर्चा काढू, असा आक्रमक इशारा मनपातील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी दिला.
ही लढाई केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, देशाची लोकशाही टिकवण्याची लढाई आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक सुनील मोदी यांनी केले. गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानाचा विषय आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी हा मोर्चा महत्त्वाचा असून, कोल्हापुरातील कामगार, झेन-जी तरुण आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापुरचा स्वाभिमान उंचावावा, असे आवाहन आनंद माने यांनी केले. तर गोकुळचा ब्रँड वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून, या संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शासनाला काळा कायदा रद्द करण्यास भाग पाडू, असा इशारा सरला पाटील यांनी दिला.