‘गोकुळ’ दूध संकलन प्रतिदिनी १७ लाख लिटरपर्यंत

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील: दूध उत्पादकांना म्हैस खरेदी करण्यासाठी ४० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय
‘गोकुळ’ दूध संकलन प्रतिदिनी १७ लाख लिटरपर्यंत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजीराजे सहकारी दूध संस्था व कामधेनू महिला दूध संस्था भुयेवाडी ता.करवीर या संस्थेच्या दूध उत्पादकांनी वीरशैव बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या ३२ म्हैशी हरियाणा व वाराणसी (उत्तरप्रदेश) येथून खरेदी केलेल्या म्हैशींचे भुयेवाडी ता. करवीर येथे माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटीलसो यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये पूजन करून या म्हैशी दूध उत्पादकांना प्रदान करण्यात आल्या.

यावेळी बोलताना माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील म्हणाले कि, गोकुळ हा दूध उत्पादकांचा संघ आहे या भावनेतून सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेत आहोत. सध्या संघाचे दूध संकलन प्रतिदिनी १७ लाख लिटरपर्यंत पोहोचले असून, गोकुळ लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल, यासाठी दूध उत्पादकांना म्हैस खरेदी करण्यासाठी ४० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या योजनेमुळे अनेक दूध उत्पादक आपले म्हैस पशुधन वाढवत असून त्यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे. याचबरोबर गोकुळच्या संकलनात सातत्याने वाढ होत आहे, असे मनोगत व्यक्त केले.

या कार्याक्रमावेळी संघाचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक माजी सरपंच संभाजी खोत यांनी केले यावेळी गावातील सर्व दुध संस्थांचे चेअरमन यांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर आभार छत्रपती शिवाजीराजे सह. दूध संस्थेचे चेअरमन संभाजी भोसले यांनी मांडले.

यावेळी माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटीलसो, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, सहा.व्यवस्थापक डॉ.प्रकाश दळवी, संकलन अधिकारी आर.एन.पाटील,दिपक पाटील, वीरशैव बँकेचे चेअरमन अनिल सोलापुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, छत्रपती शिवाजीराजे सह. दूध संस्थेचे चेअरमन संभाजी भोसले, कामधेनू महिला सह.दूध व्यावसायिक संस्थेच्या चेअरमन सौ.सारिका पाटील, भूयेवाडीचे सरपंच सचिन देवकुळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील सर्व दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.

गोकुळकडून म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळकडून म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रामाणावर राबवला जात आहे. म्हैस पालन हे दूध उत्पादकांना फायदेशीर असलेनेच दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात जातीवंत म्हैशी खरेदी करत असून, यासाठी दूध उत्पादकांनकडून मोठ्या प्रमाणात मिळत असलेला प्रतिसाद लक्षात येतो. तरी संघाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे असे मनोगत व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in