

गोंदिया जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या अवघ्या २० दिवसांच्या बाळाला संपवल्याचा काळीज पिळवटून टाकणारा खुलासा पोलिसांच्या चौकशीत झाला आहे. बाळाच्या अपहरणाचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याच्या तिच्या प्रयत्नांचाही भंडाफोड झाला. 'पतीने गर्भपात करू दिला नाही आणि मला नोकरी करायची होती. पण, बाळ आड येत होतं' अशी कबुली आरोपी आईने दिली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
अपहरणाचा रचला बनाव
मिळालेल्या माहितीनुसार, डांगोर्ली येथील रिया फाये हिने १८ नोव्हेंबर रोजी रावणवाडी पोलिस ठाण्यात येऊन तिच्या २० दिवसांच्या बाळाचे एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा दावा केला. १७ नोव्हेंबरच्या रात्री सव्वादहाच्या सुमारास घरात घुसून अज्ञात चोरट्याने बाळाला पळवून नेल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लगेच घटनास्थळ गाठून तातडीने तपास करण्याचे आदेश दिले.
आईवरच बळावला संशय
पोलिसांच्या पथकाने साक्षीदारांची चौकशी, उपलब्ध पुरावे आणि घटनास्थळाचे निरीक्षण यांद्वारे महत्त्वाचे धागेदोरे गोळा केले. तथापि, तपासादरम्यान आई रिया वारंवार आपले वक्तव्य बदलत होती. घरात जबरदस्ती किंवा घुसखोरीचा कोणताही पुरावा आढळला नाही. शिवाय, घरातील परिस्थितीतही विसंगती स्पष्ट दिसत होती. याव्यतिरिक्त मूल नको म्हणून रियाने यापूर्वी गर्भपात केल्याचेही पोलिसांना समजले. त्यामुळे संशय थेट आईवरच केंद्रीत झाला. तिला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी खाक्या दाखवताच धक्कादायक कबुली
राजेंद्र फाये (२६) व रिया यांचा २०२३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र, मूल नको होते म्हणून रियाने चार महिन्यांचा तिच्या पहिल्या बाळाचा गर्भपात केला होता. पण, यावेळी पुन्हा गर्भ राहिल्यावर पती राजेद्रने गर्भपातास स्पष्ट नकार दिला. अखेर २९ ऑक्टोबरला तिने गोड बाळाला जन्म दिला. रियाने चौकशी दरम्यान सांगितले की, तिला नोकरी करायची होती, पण बाळामुळे अडचण होणार होती. “पतीने गर्भपात करू दिला नाही… बाळामुळे घरात अडकून पडेन,” असे तिने कबूल केले. त्यामुळे तिने मुलाला संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. कबुलीनुसार, १७ नोव्हेंबरच्या रात्री १०:३० वाजता, घरच्यांना झोप लागल्यानंतर तिने बाळाला उचलले आणि मागच्या दाराने बाहेर पडली. त्यानंतर ती थेट वैनगंगा नदीच्या पुलावर गेली आणि निष्पाप बाळाला नदीत फेकून दिले. रियाच्या कबुलीनंतर पोलिसांनी वेळ न दवडता वैनगंगा नदी परिसरात मोठी शोधमोहीम उघडली. श्वान पथक, स्थानिक बचाव पथक, माच्छिमार, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पोलीस दल अशा संयुक्त पथकांनी नदीकाठ तसेच पुलाखाली तातडीने शोधकार्य सुरू केले. काही तासांच्या अखंड प्रयत्नानंतर वैनगंगा नदीच्या पुलाखाली चिमुकल्या विराजचा मृतदेह आढळला. या मन हेलावणाऱ्या दृश्याने पोलिसांसह उपस्थित स्थानिक नागरिकही हादरून गेले.