सरकार आक्रमक, जरांगेंची कोंडी

मनोज जरांगे यांच्या आक्रमक पवित्र्याने आंदोलकही आक्रमक झाले असून, सोशल मीडियावर यासंबंधी अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.
सरकार आक्रमक, जरांगेंची कोंडी

विशेष प्रतिनिधी/मुंबई : मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काल सरकारला आव्हान देण्याची भाषा केल्यानंतर सरकारने आक्रमक पवित्रा घेत त्यांची कोंडी केली आहे. त्यातच तीन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केल्याने आता जरांगे पाटील यांना आंतरवाली सराटीतच परतावे लागले आहे.

मनोज जरांगे यांच्या आक्रमक पवित्र्याने आंदोलकही आक्रमक झाले असून, सोशल मीडियावर यासंबंधी अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. तसेच व्हीडिओ, फोटोही व्हायरल होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात १० तास इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी हे आदेश काढले. दरम्यान, तीर्थपुरी येथे बस जाळल्याने या तीन जिल्ह्यातील बससेवाही बंद करण्यात आली आहे.

जरांगे यांच्यावर गुन्हे दाखल

बीड जिल्ह्यातील दोन ठिकाणी परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना घडली तेव्हा जरांगे घटनास्थळी हजर नव्हते. तरीही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. कारण त्यांच्या आवाहनानंतर समर्थकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. ८० जणांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.

राज्य सरकारने घेतलेली कठोर भूमिका

अंबड तालुक्यातील संचारबंदी आणि तीन जिल्ह्यात खंडित झालेली इंटरनेट सेवा, राजकीय टीका-टिपण्णी आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा धडाका हे लक्षात घेऊन मराठा बांधवांच्या आवाहनानुसार उपोषण स्थगित करून आंतरवाली सराटी येथे जरांगे-पाटील परतले. मात्र, आता यापुढे राज्यात दौरा करून रान पेटविण्याची घोषणा त्यांनी केली.

मनोज जरांगे भांबेरीतून अंतरवाली सराटी येथे परत आल्यानंतर पुन्हा उपोषण सुरू केले होते. मात्र, त्यानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन आमरण उपोषण स्थगित करीत असल्याची घोषणा केली. आता मी दोन दिवस डॉक्टरांकडे उपचार घेणार आहे. उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेतला जाईल. आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकार जो अन्याय करीत आहे. त्याविरोधात मी राज्यभर लढा उभारणार असून, यासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्याने मराठा बांधवांना येथे येणे अशक्य आहे. त्यामुळे मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. परंतु मराठा बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवावे. सध्या बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे अफवा पसरल्या जात आहेत. मात्र, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

जरांगेंना ग्रामस्थांनी अडवले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करून रविवारी सायंकाळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांना आंदोलक आणि ग्रामस्थांनी भांबेरी (ता. अंबड) येथे अडवले आणि मुंबईला न जाता रुग्णालयात जाण्याची विनंती केली. रात्रभर ते भांबेरीतच थांबले आणि सकाळी ते मुंबईच्या दिशेने निघाले, तेव्हा पोलिसांनी पोलिसांनी संचारबंदी लागू असल्याने तुम्हाला पुढे जाता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळू नये, म्हणून षड्यंत्र रचत आहेत. एवढेच नव्हे, तर सलाईनमधून विष घालून मला मारण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करीत मला मारायचे असेल, तर मीच फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर जातो, म्हणून ते रविवारी आंदोलनस्थळापासून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. ग्रामस्थांनी त्यांना आवाहन करूनही त्यांनी कुणाचेच ऐकले नाही. ते केवळ पाण्याचा घोट घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, त्यानंतर अंबड तालुक्यातील (जि. जालना) भांबेरी गावात त्यांना ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर ठाण मांडून जरांगे यांना अडविले. त्यानंतर तेथे रात्री थांबून पहाटेच्या सुमारास ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते. त्यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढून मी एकटाच मुंबईकडे जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

सकाळी ते पुढे निघाले, त्यावेळी त्यांच्यासोबत मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, तेथे उपस्थित पोलिसांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्याचे सांगितले. त्यामुळे जरांगे पाटील माघारी फिरले आणि अंतरवालीत जाऊन पुढील निर्णय घेऊ, असे जाहीर केले. सर्वांनी शांतता राखावी. मला हटवादी भूमिका घेऊन लोकांना अडचणीत आणायचे नाही, असेही जरांगे म्हणाले.

संचारबंदी उठल्यावर मुंबईला जाणार

मनोज जरांगे मुंबईला निघाले, तेव्हा त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने आंदोलकही होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अंबड तालुक्यात तात्काळ संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढले. त्यामुळे या परिसरात मराठा आंदोलकांना मनाई असेल. या पार्श्वभूमीवर बोलताना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठी चूक केली आहे. त्यामुळे संचारबंदी उठल्यानंतर मी मुंबईला जाणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

साखळी उपोषण सुरूच राहणार

मराठा आरक्षणासाठी मागील २६ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित केले तरी साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. आता यापुढील काळात गावागावांत जाऊन मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेणार असून, राज्यात सरकारविरोधात रान पेटविणार आहे, असे सांगतानाच आता तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मीच तुमच्याकडे येणार असल्याचा संदेश जरांगे पाटील यांनी पाठविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in