नांदेड : नांदेड येथे कृषी महाविद्यालय व्हावे, यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार महाविद्यालय स्थापण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचा जीआर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जारी केला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचे ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एक नवीन मोठी संधी उपलब्ध होत आहे.
३२ लाख लोकसंख्या असलेल्या नांदेड जिल्ह्यात कृषी महाविद्यालय नव्हते. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना येथे कृषी महाविद्यालय उभारण्यासाठी अपयश आले होते. कृषी क्षेत्राचे ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परभणी अथवा अन्य ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे नांदेड येथे कृषी महाविद्यालय उभारावे अशी मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सातत्याने लावून धरली होती. या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह कृषिमंत्र्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे.
महाविद्यालयासाठी शासनाकडून ३० हेक्टर जमीन
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेनंतर आज कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचे ज्ञान मिळविणाऱ्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना नव्या ज्ञानाचे नवे दालन उपलब्ध झाले आहे. महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी ३० हेक्टर जमीन शासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.