पेण : रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यात अधिकारी असलेला आणि राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध असलेल्या योगेश बालकृष्ण पाटील याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात ३० वर्षीय पीडितेने केलेल्या फिर्यादीवरून योगेश बाळकृष्ण पाटील (३१) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून योगेश पाटीलला अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार २०१८ ते ३० ऑगस्ट या कालवधीत पेण परिसरात घडला आहे. योगेश बाळकृष्ण पाटील याचे पेण येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणीसोबत २०१८ साली फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर त्यांच्या गाठीभेटी होत असत याच भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. योगेश पाटीलने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीर संबंध ठेवले. पीडितेने एप्रिल २०२१ साली लग्नासाठी योगेश याच्याकडे विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला.
याप्रकरणी पीडितेने एप्रिल २०२२ साली आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. त्यानंतर पीडितेने योगेशशी बोलने बंद केले होते. तरीही योगेशने तिला संपर्क करण्यास सुरुवात केल्यानंतर पुन्हा लग्नाचे खोटे आश्वासन देत शरीर सुखाची मागणी केली. ३० ऑगस्ट रोजी पीडित तरुणी वाशी येथे गेली असता योगेश पाटीलने त्या तरुणीला वाशी रेल्वे स्थानकावर बोलवून शिवीगाळ आणि मारहाण केली. योगेश पाटील केवळ आपल्या शरीराचा वापर करून घेत असल्याचे पीडितेच्या लक्षात आल्यानंतर तिने पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व त्यांना कार्यकर्त्यांना सत्तेचा व पैशाचा माज आला आहे. यामुळेच त्यांची हिंमत महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत पोहोचली आहे. अशा या असुरी वृत्तीला ठेचून काढण्याकरिता शासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच राज्यात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडली असून याची सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्र्यांची असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
- दीपश्री पोटफोडे, जिल्हा संघटिका महिला आघाडी