कागदावर ठरल्याप्रमाणे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सरकारला वाढवून वेळ मिळणार नाही - मनोज जरांगे-पाटील

मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यातील मराठा समाजातील मान्यवरांची एक बैठक जालन्यातील अंतरवाली सराटी गावात बोलावली. या बैठकीत सरकारला २४ डिसेंबरनंतर जास्तीचा वेळ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे
कागदावर ठरल्याप्रमाणे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सरकारला वाढवून वेळ मिळणार नाही - मनोज जरांगे-पाटील
Published on

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यातील मराठा समाजातील मान्यवरांची एक बैठक जालन्यातील अंतरवाली सराटी गावात बोलावली. या बैठकीत सरकारला २४ डिसेंबरनंतर जास्तीचा वेळ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तसंच राज्यभरात सापडलेल्या ५४ लाख कुणबी नोंदींच्या आधारावर राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी जरागे यांनी केली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आपलं आरक्षण ओबीसींकडे आहे. त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचं आहे. त्यांचं आपल्याला एक इंचही नको, परंतु आपलं ते का खात आहेत? हा प्रश्न आहे. धनगर आणि वंजारा समाजाला स्वतंत्र आरक्षण असल्याने यात त्यांचा काहीच प्रश्न नाही. मिळालेल्या कुणबी नोंदींच्या आधारावर अहवाल बनवून आरक्षण देण्याचा सरकाराचा शब्द आहे. राज्याच्या सगळ्या मोठ्या कायदेतज्ज्ञांनी आम्हाला लिहून दिलं आहे आणि सरकारने ते मान्य केलं आहे. त्यांच्याच शब्दावर सरकारने आरक्षण देण्याची गरज आहे. आता आपल्याला गुलालच घ्यायचा आहे.

जे कागदार ठरलं आहे, त्या आधारावर मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या. कारण हे शब्द तुमचे आणि तुमच्या तज्ज्ञांचे आहेत. सरकार आरक्षण देईल, यात मराठ्यांना शंका नाही. परंतु आपल्याला सावध रहायचं आहे, त्यामुळे आजची बैठक बोलावली असल्याचं जरांगे म्हणाले. सरकारला या बैठकीच्या निमित्ताने विनंती आहे. त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्याव, जास्तीचा वेळ मिळणार नाही. ५४ लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, अनेकांचे प्रमाणपत्र थांबवल्याची माहिती आहे. ज्यांच्या नोंदी सापडेल्या त्यांच्या घरी तलाठ्यांना पाठवून प्रमाणपत्र द्या, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in