मुंबई : मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली, तर मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? त्यामुळे भाषाविषयक द्वेष पसरवणे टाळा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जनतेला केले आहे.
राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवारी ‘महाराष्ट्र नायक’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. राज्यात सध्या भाषाविषयक वाद पेटलेला असताना आणि मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळे लोकांना मारहाण झाल्याच्या घटना घडत असताना राज्यपालांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. “अशाप्रकारच्या वृत्तीमुळे दीर्घकालीन परिणाम म्हणून महाराष्ट्राचे नुकसान होईल. आपण जर अशाप्रकारचा द्वेष पसरवला, तर कोणीही इथे गुंतवणूक करायला येणार नाही. त्यामुळे शेवटी आपण महाराष्ट्रालाच हानी पोहोचवत आहोत,” असेही राज्यपालांनी सांगितले.
“आपण जितक्या भाषा शिकू शकतो, तितक्या शिकायला हव्यात. आपण आपल्या मातृभाषेचा अभिमानही बाळगला पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड करता कामा नये. माझ्यासाठी माझी मातृभाषा महत्त्वाची आहे. तशीच ती प्रत्येक मराठी माणसासाठीही आहे. आपण भाषेच्या मुद्यावर सहिष्णू वृत्ती बाळगली पाहिजे, इतकेच मी सांगेन,” असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंशी मतभेद आहेत, पण वैर नाही - फडणवीस
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘कॉफी टेबल बुक’मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. या दोन्ही प्रमुख नेत्यांचे आभार मानताना फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानतो. आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत, आम्ही वैरी नाही. तसेच शरद पवार हे मोठ्या मनाचे आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी माझ्याविषयी केलेली टिप्पणी माझ्यासाठी अमूल्य आहे.”