गोविंदगिरी महाराजांनी केली PM मोदींची शिवरायांशी तुलना, रोहित पवारांनी केली वक्तव्ये त्वरित मागे घेण्याची मागणी

आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभूश्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असे वक्तव्य जाणे योग्य नाही....
गोविंदगिरी महाराजांनी केली PM मोदींची शिवरायांशी तुलना, रोहित पवारांनी केली वक्तव्ये त्वरित मागे घेण्याची मागणी
Published on

अयोध्येतील भव्य राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळत त्यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना त्यांचे वक्तव्य मागे घेण्याची विनंती केली आहे.

रोहित पवार यांनी गोविंददेवगिरी महाराजांना, आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, असे म्हटले आहे. तसेच, प्रभूश्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असे वक्तव्य जाणे योग्य नाही, असेही रोहित म्हणाले.

"छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच, पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत", अशी विनंती करणारे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

काय म्हणाले होते गोविंददेवगिरी महाराज?

“तप करण्याच्या परंपरेला बघून या ठिकाणी मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना कदाचित माहीत नाही, ते स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशेलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. शिवाजी महाराजांनी त्यावेळी सांगितले की, मला राज्य नाही करायचे, मला संन्यास घ्यायचा आहे. मी महादेवाच्या आराधनेसाठी जन्मलो आहे, मला महादेवाची सेवा करायची आहे. यावेळी त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावले आणि राज्य करणे ही त्यांची(महादेवाची) सेवाच आहे, असे सांगितले”, असे गोविंददेवगिरी महाराज म्हणाले. तसेच, आज आपल्याला असेच(शिवाजी महाराजांसारखे) महापुरुष प्राप्त झाले आहेत. ज्यांना भगवती जगदंबाने स्वत: हिमालयातून परत बोलावले आणि तुम्हाला भारत मातेची सेवा करायची असे सांगितले, असे म्हणत त्यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली.

ते पुढे म्हणाले, “आज मला शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांचीही आठवण होत आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन, 'निश्चयाचा महामेरू।बहुत जनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी', असे केले होते. आज आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे”, असे म्हणत त्यांनी पुन्हा नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली. गोविंददेवगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत त्यांचे वक्तव्य मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच, स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती, असे म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in