वाळू वाहतुकीविरोधात भल्या रात्री ग्रामसभा

वाळू वाहतुकीविरोधात भल्या रात्री ग्रामसभा

: तालुक्यातील नाऊर पुलालगत असलेल्या गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करण्याच्या हेतूने नदीजवळच्या एका शेतकऱ्याच्या शेतातून रस्ताचे खोदकाम सुरू

श्रीरामपूर : तालुक्यातील नाऊर पुलालगत असलेल्या गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करण्याच्या हेतूने नदीजवळच्या एका शेतकऱ्याच्या शेतातून रस्ताचे खोदकाम सुरू असताना गावातील सुमारे ७०० ते ८०० तरुणांनी या रस्त्याचे काम बंद करून तत्पर ग्रामसभा घेत यासंदर्भात ठराव घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस उपाधीक्षक यांना देण्यात आले आहे.

श्रीरामपूर-वैजापूरला जोडणाऱ्या गोदावरी नदीवर असलेल्या पुलाजवळ एका शेतकऱ्याच्या शेतातून नदीपात्राकडे जेसीबी मशीनच्या साह्याने अवैध वाळू उपसा करण्यासाठी रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. या रस्त्याचे काम काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने ही वार्ता कानोकानी सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीच वेळात गावभर पसरली. गावातील अनेक तरुण, पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी नदीपात्राकडे कुच करून संबंधित वाळू तस्कर यांना अवैध वाळू उपसा करून देणार नसल्याचा इशारा देत जेसीबी काढून घेण्याची सुचना केली असता, संबधित वाळू तस्करांनी दमबाजी करत ही शेती विकत घेतली असून, तुमचा काही संबंध नाही, अशी भूमिका घेतली; मात्र तरीही ग्रामस्थ आणि तरुणानी गाव करेल ते राव करेल का ही पद्धत अवलंबल्याने वाळू तस्करांनी माघार घेत जेसीबी काढून घेतला. या घडामोडीनंतर मोठी ग्रामसभा पार पडली. यामध्ये हजारो महिला-पुरुष ग्रामस्थ यांनी अवैध वाळू तस्करीला तीव्र विरोध दर्शवत गावातूनच नव्हे तर लगत गोदापात्रातून एकही वाळूचा खडा उचलून न देण्याची शपथ घेत कोणताही तस्कर वाळू नेण्याचा प्रयत्न केला, तर सर्व वाहने अडवून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील येईपर्यंत अवैध वाळू वाहतूक करणारे वाहने अडवून ठेवण्याचा इशारा देण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in