जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या उपोषणावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. याचं पार्श्वभूमीवर सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा यांच्यावतीने आयोजित केलेल्या या मोर्चाला सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा देत त्यात सहभाग नोंदवला.
विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा आणि राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ झाला. हजारोंच्या संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी झाल्याचं दिसून आलं. या मोर्चात दोन किलोमीटरच्या मार्गावर विविध संस्था, संघटनांच्या वतीने अल्पोहार, पाणी व्यवस्था करण्यात आली. राममंदिर चौकात मोर्चाच्यावतीने पाच तरुणींसह पाच युवकांनी आरक्षणाच्या मागणीबाबत भाषण केलं. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या विवेदनाचे वाचन करण्यात आलं.