मतदान टक्का वाढीसाठी भव्य ऑफर; मतदारांना खरेदी, खानपान आणि मनोरंजनातही मिळणार सवलत

Maharashtra assembly elections 2024 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाचा दिवस आता सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण जोर लावला असून वेगवेगळ्या स्तरांवर उपाययोजना तसेच व्यापक स्तरावर जनजागृती केली आहे. मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभाग नोंदवण्यासाठी मुंबई महानगरातील अनेक संस्था, संघटना, व्यावसायिक आस्थापना, समुहदेखील पुढे आले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र एएनआय
Published on

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाचा दिवस आता सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण जोर लावला असून वेगवेगळ्या स्तरांवर उपाययोजना तसेच व्यापक स्तरावर जनजागृती केली आहे. मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभाग नोंदवण्यासाठी मुंबई महानगरातील अनेक संस्था, संघटना, व्यावसायिक आस्थापना, समुहदेखील पुढे आले आहेत. मतदान केल्यानंतर बोटावरची शाई दाखवा आणि वेगवेगळ्या सवलती मिळवा, अशा आशयाच्या थेट योजनाच जाहीर करून या सर्वांनी पुढाकार घेतला आहे.

आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या मतदानामध्ये मतदारांनी विक्रमी संख्येने सहभाग नोंदवावा, साप्ताहिक सुट्या व मतदानाची सुटी यांना जोडून सलग सुट्या घेऊन पर्यटनासाठी न जाता मतदानाच्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीतून धडा घेतला

मुंबई महानगरात यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कमी होते. ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाढावे यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली निरनिराळे प्रयत्न करण्यात आले आहेत. त्याला प्रतिसाद देत, वेगवेगळ्या व्यावसायिक संघटना, संस्था, समूह हेदेखील मतदान जनजागृती उपक्रमांमध्ये आपआपल्यापरीने हातभार लावत आहेत. त्याही पुढे जाऊन मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी थेट सवलती जाहीर केल्या आहेत. मतदान केल्यानंतर आपल्या बोटावरील शाई दाखवा आणि दिनांक २०, २१,२२ नोव्हेंबर या दिवसांमध्ये १० ते १५ टक्के सवलत प्राप्त करा, अशा आशयाच्या या सवलती आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्र रिटेलर्स असोसिएशन, उपाहारगृह व्यावसायिकांची संघटना असलेली 'आहार' संघटना, चित्रपटगृह व्यावसायिकांची संघटना यांच्यासह इतरही अनेक खासगी उद्योगसमूह, व्यावसायिक आस्थापना यांनीदेखील आपआपल्या स्तरावर ग्राहकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. लहानसहान दुकाने, आस्थापना, व्यावसायिक यांनीदेखील अशा स्वरूपाच्या सवलती घोषित केल्या आहेत.   

मतदानासाठी जाणीवपूर्वक सुटीचा दिवस टाळला

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकअंतर्गत बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होणार आहे. यादिवशी सार्वजनिक सुटीदेखील जाहीर झाली आहे, जेणेकरून नागरिकांना मतदानासाठी पुरेसा कालावधी मिळेल. एवढेच नव्हे तर मतदानाचा दिवस हा साप्ताहिक सुटीला न जोडता स्वतंत्र असा बुधवारी ठेवण्यात आला आहे, जेणेकरून शनिवार, रविवार या साप्ताहिक सुटीला सलग जोडून फिरण्यासाठी / पर्यटनासाठी जाण्याचे प्रकार घडू नयेत. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आणि सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असतानादेखील प्रशासनाकडून अत्यंत सूक्ष्म नियोजन करून मतदार जनजागृती केली जात आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये नामवंत सिनेेकलाकार, प्रतिष्ठीत नागरिक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू इत्यादीदेखील जनतेला सातत्याने आवाहन करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in