
लासलगाव : द्राक्षची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना धडकी भरली आहे अक्षरशः तीन ते चार किमान तापमानातून द्राक्षांना ड्रीपद्वारे पाणी, औषधे देऊन तसेच द्राक्ष बागेत शेकोट्या पेटवून उब निर्माण करत द्राक्ष पीक वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करत असल्याचे चित्र संपूळे निफाडमध्ये पहावयास मिळत आहे.
आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच आकाशामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांवर नवे संकट आले आहे.
शुक्रवारी संघ्याकाळपर्यंत पाऊस आणि गारपीट न झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे चित्र पाहवयास मिळाले. आज शनिवारी आणि रविवारी पाऊस आणि गारपीटीची टांगती तलवार द्राक्ष उत्पादकांना अद्यापही कायम आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून वेगवेगळ्या कारणामुळे द्राक्ष उत्पादकांना कष्टाचे दाम मिळत नसल्यामुळे ५० हजार हेक्टरावरील द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.
उपाययोजना करण्याची गरज
कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामुळे द्राक्ष उत्पादक देशोधडीला लागले आहे. त्यात कधी थंडी तर कधी अवकाळी पावसाचा धोका अचानक निर्माण होत आहे. केंद्र सरकारने द्राक्षाचे उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, जास्तीत जास्त द्राक्षे कसे निर्यात होईल, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी मंगेश गवळी यांनी केली आहे.