
हारून शेख/ लासलगाव
द्राक्ष पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख सटाणा, देवळा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी हंगामपूर्व द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात केली आहे. रशिया मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीसाठी एक महिन्यात समुद्रामार्गे १०९ कंटेनरमधून १७६४.५३ मेट्रिक टन द्राक्ष विदेशातील बाजारपेठेत पोहोचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसामुळे हंगाम दोन आठवडे लांबणीवर पडला या हंगामामध्ये देवळा सटाणा भागातून अर्ली द्राक्षाची निर्यात होत असते तर नाशिक जिल्ह्यातून वर्षभरात साधारणपणे तीन हजाराहून अधिक कंटेनर युरोप, रशिया, श्रीलंका, कॅनडा, जर्मनी, संयुक्त अरब अमिराती (युएई) या देशांमध्ये रवाना होतात. सध्या सटाणा देवळा या दोनच निर्यात सुरू असून जानेवारी युरोपमध्ये निर्यात वाढेल, त्यासाठी द्राक्ष बागाचे प्लॉट बुकिंग सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात द्राक्ष मालाची खुडे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली होती. त्यास प्रति किलो १२३ ते १३५ रुपयापर्यंत दर मिळाला. कळवण सटाणा, मालेगाव, देवळा, (कसमादे) भागात ही प्रामुख्याने द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते येथे ऑक्टोबरपासून पुढे सुरू होतात. गेल्या पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले तरीही समस्येवर मात करीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सात समुद्रा पार रवाना करून उत्पन्नाचे स्रोत शोधले. चालू हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीचा अवलंब केला अशा द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झालेले नसल्याचे चित्र दिसून आले आहे. १०९ कंटेनरमध्ये सर्वाधिक ६० हून अधिक कंटेनर एकट्या रशियासाठी रवाना करण्यात आले आहे.