भारतातील नागरिकांना मोठा दिलासा;आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात दाखल

भारतातील नागरिकांना मोठा दिलासा;आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात दाखल

दरवर्षी शेतकरी डोळ्यांत प्राण आणून ज्याची वाट पाहतात, तो मान्सून सोमवारी १६ मे रोजी अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात दाखल झाल्याने तप्त उन्हाने होरपळून निघालेल्या भारतातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस केरळ किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असतानाच दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमग होत आहे. अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून धडक देईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मान्सून अंदमानात लवकर दाखल झाल्याने केरळमध्ये त्याचे आगमन २७ मेपर्यंत होईल. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, अंदमान-निकोबारमध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. या राज्यांमध्ये अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय विदर्भामध्येही ढगाळ वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या पर्वतीय राज्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत गारांच्या पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात पुढील दोन दिवस धुळीचे वादळ उठण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.

पुढील ५ दिवस देशाच्या

काही भागात पाऊस

भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी मान्सूनच्या परिणामाबाबत सांगितले की, दक्षिण-मध्य कर्नाटकवरील चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे व अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे पुढील ५ दिवस तामिळनाडू, कर्नाटक किनारपट्टी, केरळ व महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर उत्तर व मध्य भारतातील काही भागांत उष्ण लाटांचीही शक्यता असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांत वादळी पाऊस

मान्सूनला पोषक वातावरणाचा परिणाम म्हणून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा (यलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in