राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष! शोभायात्रांना उधाण; मुंबई, ठाणे, नागपूरसह सर्वत्र नववर्षाचा उत्साह

राज्यात मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष! शोभायात्रांना उधाण; मुंबई, ठाणे, नागपूरसह सर्वत्र नववर्षाचा उत्साह
Published on

मुंबई : राज्यात मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्यात मुंबई, ठाणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात तरुणाईसह विविध वयोगटांतील नागरिक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या सजावटीत संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. सणाच्या निमित्ताने लोकांनी नव्या संकल्पांसह वर्षाची सुरुवात केली आहे.

नागपूरमध्ये आयोजित शोभायात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. या ठिकाणी सामूहिक रामरक्षा पठण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा सण असल्याचे सांगत नव्या वर्षात सकारात्मक संकल्प घेऊन पुढे जाण्याचे आवाहन केले. तसेच देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पारंपरिक पोशाखात सहभागी झालेल्या नागरिकांमुळे नागपूरमध्ये भगवे वातावरण निर्माण झाले होते.

ठाण्याच्या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग

ठाण्यातील शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. कोपीनेश्वर मंदिरातून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली व त्यात आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि खासदार नरेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाण्यातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर आणि लेझीमच्या नादात शोभायात्रा रंगतदार झाली.

तुळजाभवानी मंदिरात गुढी

तुळजाभवानी मंदिर येथेही गुढीपाडवा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. पहाटे आरती करून मंदिराच्या शिखरावर विधीवत गुढी उभारण्यात आली. मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा आणि वाकोजी बुवा यांच्या उपस्थितीत देवीची विशेष पूजा करण्यात आली. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसानिमित्त भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली, ज्यामुळे संपूर्ण राज्यात सणाचा उत्साह अधिकच वाढला.

रत्नागिरीत गुढीपाडव्याचा जल्लोष

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीत गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचला. जिल्ह्यात विविध ठिकाणी सकाळपासून शोभायात्रा काढण्यात आल्या. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची भव्य शोभायात्रा विशेष आकर्षण ठरली. मारुती मंदिर ते राम मंदिर या मार्गावर निघालेल्या या शोभायात्रेत मांगल्याचे प्रतीक असलेल्या गुढ्या घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. सुहासिनींनी पारंपरिक वेशभूषेत नटूनथटून उपस्थिती लावल्याने वातावरण अधिकच मंगलमय झाले. एकूणच कोकणात गुढीपाडव्याचा उत्साह दिसत होता.

डोंबिवलीत स्वागतयात्रा

डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत आधुनिकतेची झलक पाहायला मिळाली. महिला रायडर्स आणि सायकलस्वारांनी पारंपरिक वेशात सहभागी होत मोटारसायकलवर गुढी उभारत अनोख्या पद्धतीने सण साजरा केला. नव्या पिढीकडून परंपरेचे जतन करण्याचा हा अनोखा प्रयत्न असल्याचे चित्र दिसून आले. महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग हे यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.

logo
marathi.freepressjournal.in