खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्रांसाठी मार्गदर्शक प्रणाली ;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या शक्ति विधेयकाला केंद्र सरकारने अद्याप मान्यता दिलेली नाही.
खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्रांसाठी मार्गदर्शक प्रणाली ;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नागपूर : राज्यात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी चालविल्या जाणाऱ्या खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्राने आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) लागू केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरू आहेत. त्याची माहिती जमा करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील विजयी भव नावाने खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या पोलिसांनी मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी वरील माहिती दिली. या प्रकरणात  दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लैंगिक शोषण झालेल्या पिडीतांना राज्य सरकारच्या योजनेप्रमाणे मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात  कोरोनानंतर २३ हजार पोलिसांची विक्रमी भरती झाल्याचे त्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. राज्यात एकाचवेळी आठ हजार पोलिसांन प्रशिक्षण देण्याची क्षमता आपल्याकडे आहे. ही प्रशिक्षण क्षमता दिडपट-दुप्पट वाढवली जाणार आहे. मात्र, तोपर्यंत निवड झालेल्यांना आपण प्रशिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे प्रशिक्षण व्यवस्थेचा आढावा घेऊन भरतीसाठी निवड झालेल्यांसाठी एक निश्चित कार्यक्रम तयार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच पोलीस भरतीवेळी संबंधित उमेदवारांनी एकाच जिल्ह्यात अर्ज भरावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महिला अत्याचाराच्या घटना  रोखण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या शक्ति विधेयकाला केंद्र सरकारने अद्याप मान्यता दिलेली नाही. कारण आपल्या विधेयकाद्वारे विविध केंद्रीय  कायद्यांचा अधिक्षेप झाला आहे. त्यामुळे केंद्राच्या काही विभागांकडून क्रिमिनल जस्टीस सिस्टीमवर होणाऱ्या परिणामांची पडताळणी सुरु आहे. तरीही शक्ती कायदा मंजूर व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे फडणवीस यांनी अन्य प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.

पोलीस प्रशिक्षण क्षमता दुपटीने वाढविणार

राज्यात सर्वात मोठी २३ हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. राज्याची पोलीस प्रशिक्षण क्षमता ही ८ हजार आहे. ही क्षमता कमी असल्यामुळे तुकडीनिहाय प्रशिक्षण देण्यात येते.  राज्यात सध्या असलेल्या पोलीस प्रशिक्षण क्षमतेमध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in