
पुणे : पुण्यामध्ये गुलेन बारी सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी नव्याने १६ नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १२७ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, पुण्यात गुलेन बारी सिंड्रोमचे रुग्ण वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी सात सदस्यांचे पथक पुण्यात पाठविले आहे. हे पथक जीबीएस नियंत्रणात आणण्याकरिता व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य विभागाला मदत करणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालायाच्या माहितीनुसार केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र दिल्ली, निमहंस बंगळुरू, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे प्रादेशिक कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथील सात तज्ज्ञांचा समावेश आहे. पुण्यातील एनआयव्ही येथील तीन तज्ञदेखील जीबीएस नियंत्रणासाठी काम करत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यातील जीबीएसच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्या संदर्भात राज्य सरकारशी समन्वय साधून उपाययोजना करण्यात येत आहे.
बुधवारी नव्याने दाखल झालेल्या १६ रुग्णांपैकी एकावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. जीबीएस रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहेत. पुण्यातील विहिरीच्या पाण्यात क्लोरिन टाकणे आणि त्याचप्रमाणे मोजण्यासाठी स्वयंचलित मीटर यंत्रणा बसवली जाणार आहे. पुण्यातील वाढत्या जी बी एस रुग्णांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा कार्यरत होणार आहे. पुण्यातील सिंहगड रोड तसेच नांदेड सिटी भागात असलेल्या विहिरींवर हे मीटर लावण्यात येणार आहेत.
पाण्याच्या शुद्धीकरणाची माहिती प्रशासनाला तात्काळ मिळणार आहे. पुणे महापालिकेकडून ही उपाययोजना राबवण्यात येणार आहे. विहिरीत गावातील नागरिकांसाठी वापरण्यात येणारे पाणी थेट धरणातून सोडले जाते. त्यानंतर विहिरीत निर्जंतुकीकरण करण्यात येतं. निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणारे औषध याचा अंदाज कर्मचाऱ्यांना येत नाही म्हणूनच आता ही यंत्रणा लावण्यात येणार आहे.
जीबीएस म्हणजे काय?
जीबीएस हा एक गंभीर आजार आहे. या आजारात रुग्ण काही दिवस अंथरुणाला खिळून राहतो. जीबीएसने ग्रस्त असलेल्या रुग्णामध्ये विषाणू हे मेंदू आणि पाठीच्या कण्याबाहेरील निरोगी नसांवर हल्ला करतात. या आजारात कधी-कधी अर्धांगवायू होतो. जीबीएसच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे हा आजार पूर्णपणे बरा होणे शक्य आहे. जीबीएसचे त्वरित निदान आणि उपचार करणे महत्त्वाचं असते.