मुरूड समुद्रकिनाऱ्यापासून ३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ९ ऑगस्ट रोजी सायंकाळीच्या सुमारास गुजरात येथील वेरावन बंदरातील बोट मासळी पकडत असतांना बोटीचा पंखा तुटल्याने बोट फरकडत कासा किल्ला परिसरावर अडकून पडली होती. बोटीचा पंखा तुटल्याने बोट पुढे जात नव्हती, म्हणून बोटीच्या तांडेलने बोट नांगर टाकून एका जागी थांबवून ठेवली होती. परंतु हवेचा जोरदार प्रहार व लाटांच्या प्रचंड माऱ्यामुळे ही बोट सरकत सरकत मोरे येथील गावदेवी मंदिर परिसरात येऊन अडकून पडली. या बोटीवर ऐकून दहा जण होते. मुरुड पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा करून कोस्टल गार्डच्या मदतीने हेलिकॅप्टर मागवून सर्वाना सुखरूप किनाऱ्याला आणण्यात यश मिळाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून समुद्रात मोठया प्रमणात वादळ निर्माण झाले आहे. या वादळामुळे गुजरातमधून मासेमारी करण्यासाठी आलेली नौका तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात भरकटत राहीली. त्यानंतर वादळाच्या प्रवाहात ती नौका मंगळवारी मुरुडच्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागे रात्रभर अडकून पडली. यावेळी बंदर खात्याने व स्थानिक प्रशासनाने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले परंतु खवळलेल्या समुद्रातील लाटांमुळे रात्री ते शक्य झाले नाही.