

मुंबई : राज्यातील सहा प्रमुख शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा आणि विश्रामगृहे उभारण्याचे काम गुजरातच्या अहमबदाबदमधील सेवादान आरोग्य फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेला एक रुपया नाममात्र भाडेपट्ट्याने जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांना परवडणाऱ्या दरात निवास, भोजन आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपविण्यात आली आहे. या संस्थेला ४९ वर्षांसाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर धर्मशाळा चालविण्याची परवानगी मिळाली आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय, यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मुंबईतील सर जे. जे. समूह रुग्णालय, कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुगणालय या परिसरात सेवादान आरोग्य फाऊंडेशनला धर्मशाळा उभारण्यासाठी वार्षिक एक रुपया नाममात्र दराने जागा दिली जाणार आहे. धर्मशाळांमधील निवास आणि इतर सुविधा केवळ शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच उपलब्ध राहतील. जागेचा अन्य कोणत्याही व्यावसायिक किंवा खासगी कारणासाठी वापर करता येणार नाही, अशी स्पष्ट अट सरकारने घातली आहे.
दोन वर्षांच्या आत धर्मशाळांचे बांधकाम करावे लागणार
धर्मशाळांचे बांधकाम, वित्तपुरवठा, सुसज्जीकरण, संचालन, देखभाल, स्वच्छता, सुरक्षा, मनुष्यबळ, विमा आणि आवश्यक परवानग्यांची जबाबदारी पूर्णपणे सेवादान आरोग्य फाउंडेशनवर राहणार आहे. राज्य सरकारकडून जमीन उपलब्ध करून देणे आणि आवश्यक प्रशासकीय सहकार्य केले जाणार आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर दोन वर्षांच्या आत धर्मशाळांचे बांधकाम पूर्ण करून त्या सुरू करणे संस्थेला बंधनकारक राहील.
अन्य राज्यांतही धर्मशाळा
यापूर्वी या सेवाभावी संस्थेला गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांत विविध शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी धर्मशाळा, विश्रांतीगृहे उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.