आंबेडकरवादी मिशनचे कदम यांना ज्ञानदीप पुरस्कार जाहीर
नांदेड : शिक्षण क्रांतीचा ध्यास घेऊन भारतभर प्रबोधन करणारे आणि शेकडो आंबेडकरवादी विचाराचे अधिकारी आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून घडविणारे दीपक कदम यांना ज्ञानदीप परिवाराकडून यावर्षीचा राष्ट्रीय ज्ञानदीप पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानदीप परिवाराचे प्रमुख डॉ. हनुमंत भोपाळे यांनी दिली.
मानपत्र, पाच हजार रुपये, शाल, पुरस्कार असे या पुरस्काराचे स्वरूप असून, हा पुरस्कार नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे 'ज्ञानदीपाची दीपावली' या कार्यक्रमात सोमवारी (दि. १३) मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. उद्घाटक म्हणून कामाजी पवार हे लाभणार आहेत. प्रमुख प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, जलदूत बाबुराव केंद्रे यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव पाटील बैस, बाबाराव पाटील शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.