"आमदार नीट वागत नाही, कारवाई करा", नार्वेकरांचा आयडी हॅक करून हॅकर्सनी राज्यपालांना पाठवला ई-मेल

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अज्ञात सायबर ठगाने ई-मेल आयडी हॅक करून राज्यपालांना मेल पाठविल्याची धक्कादायक घटना...
"आमदार नीट वागत नाही, कारवाई करा", नार्वेकरांचा आयडी हॅक करून हॅकर्सनी राज्यपालांना पाठवला ई-मेल

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अज्ञात सायबर ठगाने ई-मेल आयडी हॅक करून राज्यपालांना मेल पाठविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. त्यात काही आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलीस संमातर तपास करत आहे. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष असून, त्यांचा वैयक्तिक ई-मेल आयडी आहे. हा ई-मेल आयडी हॅक करून अज्ञात सायबर ठगाने त्याच मेलवरून राज्यपालांना एक मेल पाठविला. त्यात काही आमदार सभागृहात नीट वागत नाही. त्यामुळे या आमदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. याबाबत राज्यपाल भवनाकडून त्याची शहानिशा करण्यात आली असता राहुल नार्वेकर यांनी राज्यपालांना कुठलाही मेल पाठविला नसल्याचे उघडकीस आले. चौकशीअंती त्यांचा ई-मेल आयडी हॅक करुन राज्यपालांना हा मेल पाठविण्यात आला होता. त्यांच्या वतीने त्यांच्या कर्मचाऱ्याने मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तोतयागिरी करून फसवणूक करणे आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in