
पुणे : लग्नाच्या वेळी एमजी हेक्टर मोटार बुक केल्यावर हगवणे कुटुंबाने आमच्याशी वादावादी केली. एमजी हेक्टर कार दिली तर ती पेटवून देईन. मला फॉर्च्युनरच पाहिजे, असा तगादा वैष्णवीचे पती शशांक हगवणे यांनी लावला. माझी मुलगी गेली, मुलीचे जिवंतपणी हाल झाले. मृत्यूनंतर तिची बदनामी करू नका. मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे वकिलाला शोभत नाही, अशी विनंती वैष्णवी हगवणे हिचे वडील अनिल कस्पटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, “हगवणे कुटुंबाने केलेले कृत्य आणि मुलीचा घेतलेला बळी याला वेगळी कलाटणी देण्यासाठी आणि गुन्हा लपविण्यासाठी त्यांच्या वकिलाने वैष्णवीच्या मोबाइलवरील ‘चॅट’चा मुद्दा पुढे आणला. आरोपीचे वकील चुकीचे बोलले आहेत. मृत्यू झालेल्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे वकिलाला शोभत नाही. हगवणे कुटुंबाकडे पाच महागड्या गाड्या असल्याचे त्यांचे वकील सांगतात. मात्र त्यांच्याकडे पाच नव्हे तर फक्त एकच फोर्ड कार आहे.”
“आमच्या लेकीचे लग्न आधी दोनदा मोडले होतं. त्यामुळे आम्ही हुंडा देण्यास तयार झालो. आम्ही त्यांना ५१ तोळे सोने दिले होते. वैष्णवीच्या मोबाईलमधील चॅटबाबत आम्हाला कोणतीही पुसटशी कल्पना दिलेली नाही. उलट माझ्या जावयाला मी १ लाख ५२ हजारांचा मोबाईल भेट दिला. त्याचे हप्ते मी आजही फेडत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
पती शशांक, सासू आणि नणंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने यातील तिघांना बुधवारी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. एका दिवसाची मुदत संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले, त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. म्हणजेत त्यांचा जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.