उल्हासनगर पालिका मुख्यालयात अर्धनग्न आंदोलन

मागील दहा वर्षांपासून पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम हे कोणार्क एन्व्हायरो या कंपनीकडे आहे.
उल्हासनगर पालिका मुख्यालयात अर्धनग्न आंदोलन

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणारा कोणार्क एन्वयारो हा ठेकेदार किमान वेतन कायद्यानुसार बंधनकारक असलेला पगार देत नसून, अशिक्षित सफाई कामगारांचे कोणार्क कंपनी मागील दहा वर्षांपासून आर्थिक शोषण करीत असल्यामुळे लढा कामगार संघटनेने दोन वेळा आमरण उपोषण केले आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड आले असता पालिका आयुक्त आणि कोणार्क कंपनी प्रशासन हे अनुपस्थित राहिल्याने गायकवाड यांनी अर्धनग्न होऊन उपायुक्त मुख्यालय यांच्या दालनात आंदोलन केले.

मागील दहा वर्षांपासून पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम हे कोणार्क एन्व्हायरो या कंपनीकडे आहे. यासाठी महापालिका कोणार्क एन्व्हायरो कंपनीला दिवसाला तब्बल साडे आठ लाख रुपये देते. यामध्ये घराघरातून कचरा जमा करून तो डम्पिंग ग्राउंड पर्यंत पोहोचवणे तसेच तिथेच नष्ट करून शून्य कचरा मोहीम राबवणे यासाठी ही रक्कम दिली जाते. तसेच प्रभाग समिती तीन मध्ये रस्त्याचे साफसफाई व इतर कामांसाठी कोणार्क कंपनीचे २७० कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. असे एकूण साडे आठशे पेक्षा अधिक कामगारांचे प्रति महिना पाच ते आठ हजार रुपयांचे आर्थिक शोषण कोणार्क कंपनी प्रशासनामार्फत केले जात असल्याचा आरोप लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी केला आहे.

संदीप गायकवाड हे बुधवारी पालिकेत बैठकीला आले असता, पालिका आयुक्त अजिज शेख तसेच कोणार्क कंपनीचे प्रशासकीय अधिकारी हे अनुपस्थित दिसले. याबाबत जाब विचारण्यासाठी संदीप गायकवाड हे उपायुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे यांच्या दालनात गेले असता, त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याने संदीप गायकवाड यांनी जमिनीवर बसून आंदोलन सुरू केले. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव आणि मनीष हिवरे यांनी गायकवाड यांच्याशी चर्चा करून लवकरच पुन्हा बैठक बोलावली जाईल, असे आश्वासन दिल्यावर गायकवाड यांनी आंदोलन मागे घेतले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in