४५ घरांची जंगलवाडी विभागली दोन विधानसभा मतदारसंघात

जंगलवाडी गावाचा निम्मा भाग कराड आणि निम्मा पाटण तालुक्यात समावेश झाला आहे. ४५ घरांचे व ४०० लोकसंख्याचे गाव पाटण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विभागले गेले आहे.
४५ घरांची जंगलवाडी विभागली दोन विधानसभा मतदारसंघात

कराड : पाटण तालुक्यातील जंगलवाडी हे गाव कराड व पाटण तालुक्यांत विभागले तर आहेच पण ते पाटण आणि कराड उत्तर या दोन विधानसभा मतदारसंघात ही विभागले गेल्याने 'एक गाव आणि दोन तुकडे' अशी या गावाची गत झाली आहे. या दोन्ही मतदारसंघातील लोकप्रतिनिधीनी 'तो मी नव्हेच' चा पवित्रा घेतला असल्याने गावाला पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे.यासाठी प्रशासनाने गावाच्या समस्यांमध्ये लक्ष घालून लोकांची गैरसोय दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जंगलवाडी गावाचा निम्मा भाग कराड आणि निम्मा पाटण तालुक्यात समावेश झाला आहे. ४५ घरांचे व ४०० लोकसंख्याचे गाव पाटण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विभागले गेले आहे.

या गावात सध्याच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाणी टंचाईची समस्या खूप भासत असल्याने गावातील ग्रामस्थांनी टँकरची मागणी केली होती.मात्र दोन्ही मतदान संघातील लोकप्रतिनिधी ‘तो मी नव्हेच’चा पवित्रा घेत होते,त्यामुळे गावकऱ्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात होती. अखेर ग्रामस्थांनी लावलेल्या रेट्यामुळे या मागणीची दखल घेत प्रशासनाकडून गावात नुकताच टँकर सुरु करण्यात आला आहे.

दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून गावागावातील बोअर,विहिरींचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे लोकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.यादरम्यान,पाटण तालुक्यातील डोंगर माथ्यावर वसलेल्या जंगलवाडीतील गावकऱ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने ग्रामस्थांनी वेगवेगळ्या मार्गांनी मागणी केली होती. अखेर प्रशासनाकडून पाणी प्रश्न सोडवण्यात आला आहे.

अखेर ग्रामस्थांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा करत त्यांना जंगलवाडीतील पाणी प्रश्नाबाबत माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल घेत मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधितांना तातडीने सूचना दिल्या. त्यानंतर जंगलवाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in