मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलनचे प्रमुख दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर व काही पत्रकारांनी गोव्यातील सनातन संस्थेविरुद्ध व्यक्त केलेली धमकीची भीती “वाजवी व खरी” आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने या संस्थेने दाखल केलेले मानहानीचे दावे महाराष्ट्रात वर्ग करण्याचे आदेश दिले.
सनातन संस्थेने २०१७ व २०१८ मध्ये हमीद दाभोलकर व इतर काही पत्रकारांविरुद्ध फोंडा (गोवा) येथील न्यायालयात मानहानीचे दावे दाखल केले होते. त्यात त्यांनी खोटी व बदनामीकारक विधाने करून संस्थेची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता.
न्यायमूर्ती एन. जे. जामदार यांच्या एकलपीठाने ३ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात (जो ४ सप्टेंबर रोजी उपलब्ध झाला) हे दावे गोव्यातून महाराष्ट्रातील न्यायालयात वर्ग करण्याचे निर्देश दिले.
गोव्यात संस्थेचा “प्रभाव” असल्याने आपल्या जीवाला धोका आहे, त्यामुळे फोंडा न्यायालयाऐवजी हे दावे महाराष्ट्रातील इतर कोणत्याही न्यायालयात चालवावेत, अशी विनंती दाभोलकर यांनी केली होती.
न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
सीबीआय सारख्या प्रमुख तपास संस्थेलाही या हत्येतील सूत्रधाराचा ठावठिकाणा लावता आला नाही, त्यामुळे हमीद दाभोलकर अन्य अर्जदारांच्या मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
हमीद दाभोलकर यांनी वडिलांच्या हत्येच्या खटल्यात साक्ष दिली होती व ते अद्याप संस्थेच्या विचारसरणीचे खुलेआम टीकाकार आहेत. पानसरे (फेब्रुवारी २०१५), कलबुर्गी (ऑगस्ट २०१५) व लंकेश (सप्टेंबर २०१७) यांसारख्या संस्थेच्या विचारांचा विरोध करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या झाल्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.