हापूस आंब्याचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले!

वाशी एपीएमसी फळ बाजाराचे संचालक संजय पानसरे यांच्याशी केलेली खास बातचीत
हापूस आंब्याचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले!

कर्नाटकी आंबा आणून रत्नागिरी बाजारपेठेत हापूस आंबा म्हणून विक्री सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून सर्वसामान्य ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूकीचा प्रकार अलीकडेच १७ मे रोजी रत्नागिरीतील आंबा बागायतदारांनी उघडकीस आणला. याबाबत आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कशाप्रकारे काळजी घेतली जाते? अशी फसवणूक होण्याची कारणे काय? याबाबत खुलासा करताना वाशी एपीएमसी फळ बाजारचे संचालक संजय पानसरे यांनी दैनिक ‘नवशक्ती’शी बातचीत करताना अनेक गोष्टींचा खुलासा केला. हापूस आंबा उत्पादन यंदाच्या वर्षी ५० टक्क्यांनी घटल्याने कर्नाटक आंबा विक्रीचे प्रमाण वाढल्याचे सांगितले.


रत्नागिरी बाजारपेठेत हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंबा विक्री सुरू आहे, हे खरे आहे का?

हो. महाराष्ट्रातील बऱ्याच बाजारपेठांमध्ये अशा प्रकारची फसवणूक सुरू आहे.

याची नेमकी कारणे काय?

कर्नाटक आंबा स्वस्त दरात बाजारात उपलब्ध आहे. हा आंबा सध्या ८० ते १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर कोकणचा हापूस १०० ते २०० रुपये किलोने विक्री होत आहे. स्वस्त असल्याने बाजारातून कर्नाटक आंबा खरेदी करत किरकोळ बाजारात देवगड, रत्नागिरी हापूस म्हणून अधिकच्या दराने विक्री होत आहे.


यंदा हापूस आंब्याचे उत्पन्न घटले आहे का?

हो. गतवर्षीच्या तुलनेने यंदा हापूस आंब्याचे उत्पन्न ५० टक्क्यांनी घटले आहे. याचाच गैरफायदा घेतला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला सध्या बाजारात कर्नाटक आंब्याची आवक ७० टक्के एवढी आहे.

असे प्रकार प्रतिवर्षी घडतात. यावर कारवाई का केली जात नाही?

कोणताही आंबा, उत्पादन आपण थांबवू शकत नाही. जसा आपल्या राज्यात कर्नाटक आंबा विक्री केला जातो. तसाच कर्नाटक राज्यात देखील आपला हापूस आंबा विक्री केला जातो. फक्त ज्या त्या भागातला आंबा त्या त्या भागाचा म्हणूनच विक्री करणे हा एकच उपाय यावर आहे.

यामध्ये नफा कोणाचा तोटा कोणाचा?

किरकोळ बाजारात विक्री किंमतीपेक्षा अधिकचा दर आकारून काही व्यापारी, विक्रेते कर्नाटक आंबा विक्री करतात. ते यातून अधिकचा निव्वळ नफा मिळवतात. मात्र शेतकरी यामध्ये सर्वाधिक नुकसानीत जातो.

वाशी एपीएमसी फळ बाजारात कोणती काळजी घेतली जाते?

आपण सुरुवातीपासूनच कर्नाटक आंबा आणि हापूस आंबा यातील फरक ग्राहकांना स्पष्ट करतो. स्वस्त असणारा आंबा निश्चित कर्नाटक आंबा आहे. कोकणातून येणार हापूस आंबा हा महाग असतो. यामुळे किंमत आणि आवक यावरून आपण ग्राहकांना जागरूक करतो. तसेच असा प्रकार आढळल्यास प्राथमिक ताकीद संबंधित व्यापाऱ्याला देण्यात येते.

एक प्रमुख या नात्याने आपण काय सांगाल?

आंबा हे फळ सर्वांच्या जिव्हाळ्याचे आहे. ग्राहकांनी व्यापाऱ्यांच्या भूलथापांना बळी न पडता किंमत पाहून आंबा खरेदी करावा. हापूस आणि कर्नाटक दोन्ही दिसायला जवळपास सारखेच असल्याने किरकोळ बाजारातून आंबा खरेदी न करता घाऊक बाजारातून योग्य आंबा जास्त संख्येने खरेदी करावा. जर कर्नाटक आंबा घेतला असेल तर तो कर्नाटक म्हणूनच खावा. हापूस घेतला असेल तर तो हापूस म्हणून त्याचा आस्वाद घ्यावा. कोणतीही फसगत बाजार आवारात झाली, तर तात्काळ तक्रार दाखल करावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in