Har Ghar Tiranga : महाराष्ट्रातील अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकणार! ‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ - मुख्यमंत्री

घरोघरी तिरंगा अभियान राष्ट्र प्रेमाची नवी उभारी देईल, कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
Har Ghar Tiranga : महाराष्ट्रातील अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकणार! ‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ - मुख्यमंत्री
Published on

मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची जाणीव ‘घरोघरी तिरंगा अभियान‘ आपल्याला सतत करून देईल. घरोघरी तिरंगा अभियान राष्ट्र प्रेमाची नवी उभारी देईल, कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या वर्षी अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकणार, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदानात शुक्रवारी घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई शहराचे पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास विकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंद राज, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी व अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांची यावेळी उपस्थिती होती.

कॅन्व्हासवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी

मुख्यमंत्री शिंदे आणि मान्यवरांनी हुतात्मा स्मृती स्तंभास अभिवादन केले. कार्यक्रमानंतर पदयात्रा आणि सायक्लाथॉन यात्रेस यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यानंतर शिंदे यांनी तिरंगा कॅन्व्हासवर स्वाक्षरी केली आणि त्याठिकाणी असलेल्या घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉइंटवर सेल्फीही घेतला.

सर्वांच्या सहभागातून अभियान यशस्वी होणार!

अभियानात गावागावात, शहरात रॅली, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून हे अभियान साजरे करायचे आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात विकास आणि कल्याणकारी योजनाच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याचे काम राज्य शासन करत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

ऑलिम्पिक स्पर्धेतील विजेत्यांचा अभिमान!

आपल्या खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत विविध पदक मिळवून तिरंगा फडकवला, याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. आपल्या राज्याच्या स्वप्नील कुसळे यांच्यासह नीरज चोप्रा, मनू भाकर, हॉकी संघाने पदक पटकावले. ही खरोखरच अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in