पिंपरी-चिंचवड येथे विवाहितांचा छळ

लग्न झाल्यानंतर मुली सासरी होणारा त्रास माहेरच्या लोकांना सांगत नाहीत. सासरच्या लोकांकडून त्रास वाढल्यानंतरच किंवा सासरच्या लोकांचा त्रास सहन होत नाही
पिंपरी-चिंचवड येथे विवाहितांचा छळ
फोटो सौ - Pixabay

पिंपरी : उद्योगनगरी, श्रीमंत शहर अशी ओळख असणाऱ्या शहरातच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. वंशाचा दिवा, माहेरहून पैसे आणणे, नोकरी, संशय अशा कारणांमुळे शहरातील विवाहितांचा छळ होत आहे. मागील वर्षी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या ठाण्यांमध्ये या प्रकरणी २९२ गुन्हे दाखल झाले आहेत.

मुलीचे लग्न झाल्यानंतर वंशाचा दिवा हवा, घर, वाहन, व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणणे, नोकरी करून घरात पैसे आणणे, चारित्र्यावर संशय घेणे अशा विविध कारणांमुळे शहरात विवाहितांचा छळ होत आहे. झोपडपट्टीमधील कुटुंबांपासून उच्चभ्रू कुटुंबामध्येही या प्रकारच्या घटना घडल्या आहेत. असुशिक्षित लोकांबरोबरच सुशिक्षित तरुणही पत्नीचा छळ करीत असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून लक्षात येत आहे.

लग्न झाल्यानंतर मुली सासरी होणारा त्रास माहेरच्या लोकांना सांगत नाहीत. सासरच्या लोकांकडून त्रास वाढल्यानंतरच किंवा सासरच्या लोकांचा त्रास सहन होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या या गोष्टी माहेरच्या लोकांना सांगतात. तोपर्यंत नवऱ्यासह सासू-सासरे, नणंद, दीर अशा सर्वांनीच विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केलेला असतो. अनेकदा मुली माहेरच्या आणि सासरच्या लोकांच्या इभ्रतीला घाबरून या गोष्टींची कोठेही वाच्यता करीत नाहीत.

पिंपरी-चिंचवड शहरातील विवाहिता आता या गोष्टींची थेट पोलिस ठाण्यात तक्रार देत असून, संबंधितांवर गुन्हे दाखल होत आहेत. गेल्या वर्षात शहरात कौटुंबिक हिंसाचाराचे २९२ गुन्हे दाखल झाले आहेत.

प्रत्यक्षात दाखल गुन्ह्यांपेक्षा जास्त महिला सासरच्या छळाला बळी पडल्याची शक्यता आहे. ठाण्यात आलेल्या तक्रारी अर्जांवरून पोलिस बहुतांश प्रकरणांमध्ये समुपदेशन करतात. मात्र, मूल न होण्याच्या प्रकरणांमध्ये महिला समोर येऊन तक्रार देण्यास धजावत नाहीत, असे निरीक्षण आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in