
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने जबरदस्त धक्का दिला. या पराभवानंतर काँग्रेस तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवून बुलढाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे बळकटीकरण होईल आणि त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पुन्हा एकदा महाराष्ट्रात उभारी घेईल, असा विश्वास काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा बिर्ला मातोश्री सभागृहात संपन्न झाला. यावेळी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, माजी मंत्री अमित देशमुख, यशोमती ठाकूर, अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, बी. व्ही. व्यंकटेश, प्रदेश कार्याध्यक्ष खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शायरीने केली, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, असे म्हणत त्यांनी भाषणला सुरुवात केली. ते म्हणाले की, विरोधी पक्ष भाजप, सक्षम नाही म्हणूनच त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले. आपल्याकडे नेतृत्व आहे पण कार्यकर्त्यांची एकएक कडी जोडायची आहे, कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने नवे पर्व - थोरात
हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. लोकसभेतील पराभवाची कारणमीमांसा करू व पक्ष पुन्हा उभा करण्याचे काम करू. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या त्याला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. गुजरातमध्ये त्यांनी पक्षासाठी जोमाने काम करून मोठे यश मिळवून दिले.
काँग्रेस पुन्हा सर्वात मोठा पक्ष होईल - पटोले
नाना पटोले म्हणाले की, चार वर्षात संघटनेला बळ देण्याचे काम केले, पोटनिवडणुकांसह अनेक निवडणुका जिंकल्या. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आता आपल्याला पुढची लढाई लढाईची आहे. अफवांना बळी फडू नका, लोकांची कामे करा, महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
‘संख्याबळ नव्हे, इच्छाशक्ती महत्त्वाची’
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, २०२४ च्या लोकसभेत मोठा विजय मिळवला पण विधानसभेत मात्र काँग्रेसला अपयश आले. आता पुन्हा जोमाने काम करावे लागणार आहे. संख्याबळ महत्त्वाचे नाही तर लढण्याची इच्छाशक्ती लागते आणि काँग्रेस पक्ष कधीच संपणारा नाही.
लढाईतील आयुधे बदलली आहेत, रस्त्यावर उतरून लढावे लागेल. आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे.
- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष